कर्नाटकमधल्या राजकीय नाट्यानंतर आता भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा राज्यपालांच्या भेटीसाठी गेले आहेत. राज्यपालांकडे ते सत्तास्थापनेचा दावा करतील आणि आजच त्यांचा शपथविधी आज संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. तर बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना ३० जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.  येडियुरप्पा हे कर्नाटमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आहे. इतकंच नाही तर जे. पी. नड्डा हे यासंदर्भातली घोषणा आज दुपारी करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर आपण आजच शपथविधीसाठी राज्यपालांकडे मागणी करणार असल्याचे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

कर्नाटकमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून राजकीय महाभारत सुरु होते. सुरुवातीला ११ आमदारांनी बंडखोरी केली त्यानंतर आणखी सहाजणांनी बंडखोरी केली. ज्यामुळे काँग्रेसच्या टेकूवर उभे असलेले कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले. या सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही त्यामुळे अवघ्या १४ महिन्यांमध्येच कुमारस्वामी यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. बहुमत सिद्ध न करता आल्याने कुमारस्वामी यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाच्या बी. एस. येडियुरप्पा यांनी दावा केला आहे. आता नेमके काय होणार हे आजच स्पष्ट होईल.