चीनकडून अरुणाचल प्रदेशात घुसखोरीचा प्रयत्न सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चीनच्या लष्कराकडून लाईन ऑफ अॅक्च्युअल कन्ट्रोलपासून (एलएसी) भारतीय हद्दीत १०० किमीपर्यंत घुसखोरी केल्याचा दावा अरुणाचल प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि अरुणाचल पूर्वचे खासदार तापिर गाओ यांनी केला आहे.
गाओ यांनी म्हटले की, “चीनच्या लष्कराकडून अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यातील चागलागम गावाजवळून वाहणाऱ्या एका नदीवर लाकडी पूल बांधण्याचे काम सुरु आहे.” या पूलाच्या बांधकाचा व्हिडिओ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चित्रीत केला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपा कार्यकर्ते ऑगस्ट महिन्यांत या भागात शिकारीसाठी गेलेले असताना त्यांच्या ही बाब निदर्शनास आल्याचे गाओ यांनी म्हटले आहे. टाइम्सनाऊने याबाबत वृत्त दिले आहे.
गाओ यांच्या दाव्याला उत्तर देताना भारतीय लष्कराने म्हटले की, आम्ही ही घटना तपासून पाहत आहोत. मात्र, या हालचालींवरुन असं वाटतंय की हे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे गस्ती पथक असावे. ऑक्टोबर २०१८ मध्ये चीनच्या लष्कराने याच ठिकाणी घुसखोरी केली होती. तसेच त्यांनी येथे तात्पुरते तंबूही टाकले होते. याची माहिती तिथल्या स्थानिक शिकाऱ्यांनी दिली होती. यावर अद्याप संरक्षण खात्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. चीनच्या सैन्याने हा भाग सोडला आहे की नाही याबाबतही अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.
चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या तुकड्यांनी गेल्यावर्षी अप्पर दिबांग व्हॅलीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी इथल्या गावांतील काही आदिवासींना येथे ११ शस्त्रधारी सैनिक दिसले होते. त्यांनी त्यांच्या संशयास्पद हालचालींचे काही फोटोही घेतले होते. याची माहिती त्यांनी भारतीय लष्कराला आणि स्थानिक प्रशासनालाही दिली होती.
यापूर्वी २०१७ मध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये मोठा संघर्ष पहायला मिळाला होता. भूतान आणि चीन यांच्यामधील वादग्रस्त भाग असलेल्या डोकलाम पठारावर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीकडून सुरु असलेले रस्त्याचे काम भारतीय जवानांनी थांबवले होते. चीन आणि भारतादरम्यान जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमधून लाईन ऑफ अॅक्च्युअल कन्ट्रोल (एलएसी) आखण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 4:12 pm