जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदी भाजपा नेते आणि माजी मंत्री मनोज सिन्हा यांची नियुक्ती करणअयात आली आहे. जीसी मूर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी आता मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. काल मूर्मू यांनी आपल्या उपराज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता.

बुधवारी संध्याकाळी गिरीष चंद्र मूर्मू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला एक वर्ष पूर्ण झालं. मूर्मू यांनी ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात काश्मीर शांतता, स्थिरता आणि विकासाच्या मार्गावर पुढे गेल्याचं सांगण्यात येतं. तसंच राज्यात दहशतवाद आणि दगडफेकीसारख्या घटनांमध्येही घट झाली आहे.

कोण आहेत मनोज सिन्हा?

मनोज सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहे. मनोज सिन्हा हे भाजपाचा मोठा चेहराही मानले जातात. २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देता आलं नव्हतं. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती.