पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया संपताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. गेल्या काही दिवसांत राज्यात विविध ११ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप करत भाजपने तृणमूलला लक्ष्य केले. दुसरीकडे, हिंसाचारात आपल्या एका कार्यकर्त्यांचीही हत्या झाल्याचा आरोप तृणमूलने केला. दरम्यान, विधानसभा निवडणूकीनंतर झालेल्या हिंसाचारादरम्यान बंगालमधील भाजपाचे सुमारे ४०० कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय आसाममध्ये आले आहेत असा दावा आसामचे मंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केला आहे.

“भाजपा बंगालचे ३०० ते ४०० कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय छळ आणि हिंसाचाराचा सामना केल्यावर आसाममधील धुबरी येथे निघून आले आहेत. आम्ही त्यांना निवारा आणि अन्न देत आहोत. दीदींनी लोकशाहीच्या नावाखाली सुरु असलेले राक्षसी नृत्य थांबवायलाचं हवं! बंगाल यापेक्षा अधिक चांगल्यासाठी पात्र आहे,” अशा शब्दात हेमंत बिस्वा शर्मा यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बंगालच्या काही भागात भडकलेल्या हिंसाचारात गेल्या दोन दिवसांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसाचाराबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे राज्यपालांनी सांगितले. केंद्रीय गृह मंत्रालयानेदेखील या हिंसाचाराचा अहवाल मागवला आहे.

आणखी वाचा- “जुने व्हिडिओ दाखवून भाजपा हिंसाचाराच्या घटनांचा बनाव करत आहे”- ममता बॅनर्जी

तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थकांनी आपल्या कार्यकर्त्यांचा बळी घेतला, महिला सदस्यांवर हल्ला केला, घरांची तोडफोड केली, पक्षातील सदस्यांची दुकाने लुटली आणि पक्षाच्या  कार्यालयांची तोडफोड केली असा आरोप भाजपाने केला आहे. पश्चिम बंगालच्या सहा जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला असल्याचा दावा भाजपाने केला. तर दुसरीकडे तृणमूल कॉंग्रेसने रविवारी पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळवल्याने भाजपातर्फेच हा हिंसाचार होत असल्याचा दावा केला आहे.

पूर्व वर्धमान जिल्ह्यात तृणमूल कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या असून रविवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या भांडणात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे असे तृणमूल कॉंग्रेसच म्हणणे आहे.