भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवी राजे शिंदे यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. खोकला, ताप आणि घशात त्रास होऊ लागल्यानं दोघांनाही दिल्लीतील रुग्णालयात सोमवारी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली होती.

आयएएनएस वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे व त्यांच्या आई माधवी राजे शिंदे यांना खोकला व ताप आला होता. त्याचबरोबर घशात त्रास होऊ लागल्यानं दोघांनाही सोमवारी दिल्लीतील साकेत परिसरातील मॅक्स सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांचीही करोना चाचणी करण्यात आली, असं आयएएनएसनं म्हटलं आहे.

दरम्यान, दोघांच्याही चाचणीचे रिपोर्ट आले असून, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांच्या आई माधवी राजे शिंदे यांनाही करोना झाल्याचं निदान झालं आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना करोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त कळताच अनेक नेत्यांनी ट्विट केलं आहे. त्यांची तब्येत तातडीनं बरी व्हावी, अशा सदिच्छा नेत्यांनी दिल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये बाजूला टाकलं गेल्याच्या नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतला होता. मध्य प्रदेशमध्ये लवकरच राज्यसभेच्या निवडणुका लागणार आहे. यात ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.