मागील महिन्यात २३ मे रोजी लोकसभेचा जो निकाल लागला त्या निकालात भाजपाने बाजी मारली. या निकालात भाजपाने पश्चिम बंगालच्या ४२ जागांपैकी १८ जागांवर विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला जे यश मिळालं त्यात कैलाश विजयवर्गीय यांचा सिंहाचा वाटा होता. मंगळवारी कैलाश विजयवर्गीय इंदूर या ठिकाणी पोहचले. त्यावेळी तिथे काही पोस्टर्स लावण्यात आली होती. ज्या पोस्टरमध्ये ममता बॅनर्जी यांना बिबट्याच्या रूपात दाखवण्यात आलं आहे. तर कैलाश विजय वर्गीय बिबट्याच्या रूपात असलेल्या ममतांचा गळा दाबत आहेत असे दाखवण्यात आले आहे. इंदूर या ठिकाणी ही पोस्टर्स लावण्यात आल्याने या पोस्टर्सकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

या पोस्टर्सची चांगलीच चर्चा होते आहे. कारण कैलाश विजयवर्गीय ज्या बिबट्याचा गळा दाबताना दाखवले आहेत त्या बिबट्याचा चेहरा ममता बॅनर्जी यांचा आहे. कैलाश विजयवर्गीय यांचे समर्थक हे त्यांना बंगाल टायगर म्हणत आहेत. या पोस्टर्समुळे वाद निर्माण झाल्याने आता या पोस्टरवरचा ममता बॅनर्जी यांचा चेहरा झाकण्यात आला आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळला होता. हिंसाचाराच्या या घटनेत काही माणसं मारलीही गेली. या हिंसाचारावरून भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारणही बघायला मिळालं. आता कैलाश विजयवर्गीय यांच्या या पोस्टरवरूनही वाद निर्माण झाला. ज्यानंतर पोस्टरमधला ममता बॅनर्जींचा फोटो झाकण्यात आला आहे.