उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. पीडित तरुणी १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, यावरून आता राजकारणही होत असल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

“राहुल गांधी हे पीडितेच्या न्यायासाठी नाही तर राजकारणासाठी हाथरसला जात आहेत. जनतेला काँग्रेसचे रणनीती ठाऊक आहे. यामुळे २०१९ मध्ये जनतेनं भाजपाला निवडून दिलं. लोकांना माहित आहे की ते (राहुल गांधी) पीडितेला न्याय देण्यासाठी नाही तर राजकारण करण्यासाठी हाथरसला जात आहेत,” असं स्मृती ईराणी म्हणाल्या.

आणखी वाचा- “मला कोणीच अडवू शकत नाही”, राहुल गांधींचा पीडितेच्या कुटंबाला भेटण्याचा निर्धार

पीडितेच्या कुटुंबीयांचा माध्यमांशी संवाद

पीडितेच्या आईनंदेखील माध्यमांशी संवाद साधताना आपली व्यथा मांडली आहे. “शेवटीदेखील आम्हाला आमच्या मुलीचा चेहरादेखील पाहू दिला नाही,” असं पीडितेच्या आईनं सांगितलं. तसंच एका अधिकाऱ्यानं तुमच्या खात्यात किती पैसे आले हे तुम्हाला माहित आहे का? असंही म्हटल्याचं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- पोलीस महासंचालक घेणार हाथरसच्या पीडित कुटुंबाची भेट; हायकोर्टानं फटकारल्यानंतर धावाधाव

“एसआयटीची टीम आणि दुसरे अधिकारी आपल्या घरी आले होते तेव्हा ते बोलत होते. तुम्हाला पैसे मिळणार आहेत… अरे तुम्हाला पैसे मिळणार आहे… तुम्हाला माहित नाही तुमच्या खात्यात किती पैसे आले?,” असं त्यावेळी अधिकारी म्हणत असल्याचं पीडितेच्या आईनं सांगितलं. आजतक या वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी आपली व्यथा मांडली. दरम्यान, आपल्या खातात किती पैसे आले हे माहित नाही. परंतु आपल्याला न्याय पाहिजे असंही त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटल्याचं सांगितलं. यावेळी त्यांच्या अन्य कुटुंबीयांनीदेखील संवाद साधला. “या प्रकरणी कोणाला हटवण्यात आलं याची माहिती आपल्याला नाही. आपल्याला या प्रकरणी सीबीआयकडूनही तपास नको. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायधीशांमार्फत झाला पाहिजे. त्यांच्य़ा अध्यक्षतेखाली तपास झाला पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.