मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. अशात आता मोदी सरकारवर दबाव आणण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यासमवेत पाच विरोधी पक्षांचे नेते आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही या नेत्यांमध्ये असणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे पाच नेते संध्याकाळी पाच वाजता भेटणार असल्याची माहिती आहे. कोविड प्रोटोकॉल असल्याने पाच नेत्यांनाच भेटण्याची संमती राष्ट्रपतींनी दिली आहे. या मुद्द्यावरून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शरद पवार आणि इतर नेत्यांवर टीका केली आहे.

“शेतकरी हा देव असतो. पंतप्रधान मोदी यांनी आणलेला कायदा हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा कायदा क्रांती घडवण्याचे सामर्थ्य राखतो. पण राजकीय नेतेमंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारे नेतेमंडळी आता शेतकऱ्यांचे नाव पुढे करून राष्ट्रपतींची भेट घ्यायला जात आहेत”, अशा शब्दात त्यांनी शरद पवार आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांवर टीका केली.

आणखी वाचा- केंद्रीय मंत्री पुरस्कार घेऊन स्टेजवर उभे होते, मात्र ‘त्या’ कृषीतज्ज्ञाने पुरस्कार स्वीकारण्यास दिला नकार

आणखी वाचा- देशातील ‘या’ महामार्गावर शेतकऱ्यांसाठी सुरु आहे मोफत डिझेल पुरवठा कारण…

लोकांनी या विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाकारलं. शेतकऱ्यांनीही त्यांना दूर केलं. अशा परिस्थितीत या राजकीय नेत्यांनी शेतकऱ्यांची माफी मागायला हवी. कारण शेतकऱ्यांच्या या अवस्थेला ते जबाबदार आहेत. सर्व स्तरातून नाकारण्यात आलेले लोक आता शेतकऱ्यांचे हितचिंतक बनू पाहत आहेत. त्यांचा ढोंगीपणा आता लोकांनाही कळून चुकला आहे”, असेही शिवराजसिंह चौहान म्हणाले.