केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मंदिर जाण्यावरुन अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. त्याचबरोबर नक्वी यांनी काँग्रेसवरही टीका केली. घरात टोपी आणि रस्त्यावर टिळा लावला जात आहे. एकीकडे धर्मनिरपेक्षतेबाबत बोलायचे आणि दुसरीकडे जातीयवाद निर्माण करायचा. ‘ग्रँड ओल्ड पार्टी’ असलेल्या काँग्रेसची ही ‘ब्रँड न्यू’ ओळख बनली आहे. सध्या या पक्षाची स्थिती अशी आहे की, ना त्यांना माया मिळाली ना राम, असा टोलाही त्यांनी लगावला.

राहुल गांधी हे सोमवारी पुष्कर येथील ब्रह्म मंदिरात गेले होते. तिथे त्यांनी विधिवत पुजा केली. ब्रह्म मंदिरात जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी अजमेरमध्ये १३ व्या शतकातील सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यात जियारतही केली होती. राहुल यांच्याबरोबर माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हेही उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राहुल गांधी यांच्या मंदिर जाण्यावरुन प्रश्न उपस्थित केले होते. गुजरातमध्ये राहुल गांधी हे अनेक मंदिरात गेले होते. जेव्हा ते मंदिरात दर्शनासाठी गुडघ्यावर बसले, तेव्हा ही मशीद नव्हे मंदिर आहे, असे पुजारींना सांगावे लागल्याचे योगी आदित्यनाथ यांनी मध्य प्रदेशमधील धार येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना सांगितले होते.