आसामच्या लोकांनी कोविड विषाणूपासून बचाव करण्यासाठी मुखपट्टी वापरण्याची गरज नाही, कारण आता राज्यात करोनाची साथ उरलेली नाही, असे वक्तव्य आसामचे आरोग्य मंत्री व भाजप नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी केले आहे. देशात कोविड १९ विषाणूची दुसरी लाट जोरात असताना आसामच्या आरोग्य मंत्र्यांनी केलेले विधान आश्चर्यकारक मानले जात आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची दैनंदिन संख्या रोजच वाढत आहे. ‘दी लल्लनटॉप’ शी बोलताना त्यांनी सांगितले,की लोक मुखपट्टी का वापरतात याचे मला आश्चर्य वाटते.  लोक मुखपट्टी घालून घबराट निर्माण करीत आहेत. प्रत्यक्षात करोना आसाममधून केव्हाच गेला आहे.

केंद्र सरकारने सामाजिक अंतर, मुखपट्टी यासारख्या उपायांचा वापर करण्याच्या सूचना वारंवार दिलेल्या असताना त्यांच्याच पक्षाचे आसाममधील आरोग्य मंत्री लोकांना विपरीत सल्ला देत आहेत. तुमचा हा सल्ला विपरीत नाही का, या प्रश्नावर सरमा यांनी सांगितले,की केंद्र सरकार सूचना व मार्गदर्शक तत्त्वे काढू शकते पण आसामची परिस्थिती वेगळी आहे. आसाममध्ये आता करोना राहिलेला नाही. जेव्हा करोना परत येईल तेव्हा मी लोकांना त्याची सूचना देऊन पुन्हा मुखपट्टी वापरायला सांगीन. मुखपट्टी व सामाजिक अंतरासह अनेक उपाय इतर राज्ये करीत असताना तुम्हाला मुखपट्टीची आसाममध्ये गरज का वाटत नाही, असे विचारले असता त्यांनी सांगितले,की मी म्हणतो करोना नाही म्हणजे नाही. त्यामुळे मुखपट्टी वापरण्याचा प्रश्न येतोच कुठे. जर मुखपट्ट्याच वापरायच्या असतील तर ब्युटी पार्लर कसे चालवता येतील, ब्युटी पार्लरसुद्धा चालले पाहिजेत. मुखपट्टीने तात्पुरता दिलासा मिळतो. पण सध्या तरी राज्यात करोना नाही, त्यामुळे मुखपट्टी वापरण्याची गरज नाही. जेव्हा करोना राज्यात परत येईल तेव्हा मुखपट्टी लावण्यास सांगितले जाईल. जे लावणार नाहीत त्यांना पाचशे रुपये दंडही करू. पण सध्या करोना राज्यात अजिबात नाही.

सरमा म्हणाले,की बिहूचा सण आम्ही कुठल्याही निर्बंधाशिवाय साजरा करणार आहोत, त्याचे स्वरूप उत्साहाचे व भव्यदिव्य असेल. करोनाचा त्यात कुठलाही धोका नाही.

मुखपट्टी न लावण्याच्या सल्ल्याबाबत तुम्ही तज्ज्ञांना विचारले आहे का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले,की तज्ज्ञांना याबाबत विचारण्याची गरज नाही. एक वर्ष करोना होता. आता नियम शिथिल केले आहेत हा दिलासा आहे. हा अंतरिम किंवा अंतिम दिलासा असू शकतो. जेव्हा दैनंदिन शंभर रुग्ण सापडू लागतील तेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन लोकांना मुखपट्टी वापरण्यास सांगेन.

सरमा म्हणाले,की आसामची अर्थव्यवस्था १८-१९ टक्के वेगाने वाढत आहे. लोकांनी वर्षभर करोनाचा त्रास भोगला. करोना टाळेबंदीने किंवा त्याबाबतच्या चर्चेने भीती निर्माण होते. केंद्राने सगळ्या राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे सांगू नयेत. जेथे रुग्ण जास्त असतील त्या राज्यांना केंद्राने मार्गदर्शक तत्त्वे सांगावीत.