तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्यास विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा बंद असल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

“देशांतील जनताही जाणून आहे की हा तर शेतकरीविरोधी बंद आहे. शेतकऱ्याला योग्य भाव मिळू नये यासाठी आजचा बंद, शेतकरी दलाल आडत्यांच्या जोखडात रहावा यासाठी आजचा बंद, शेतकऱ्यांचा नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा बंद आहे. पण आता शेतकरी फसणार नाही,” असं उपाध्ये म्हणाले. या सोबत त्यांनी #farmerwithmodi हा हॅशटॅगही वापरला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा- नवे कृषी कायदे रद्द करू नका, हरयाणातील काही शेतकरी संघटनांचं कृषीमंत्र्यांना पत्र

आणखी वाचा- “मुखवटे बदलले तरी चेहरे तेच, डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच”; भाजपाचा विरोधकांवर निशाणा

हरयाणातील शेतकऱ्यांनी घेतली कृषीमंत्र्यांची भेट

सोमवारी काही शेतकरी संघटनांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या काही संघटनांनी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन केलं. तसंच यासंदर्भात एक पत्रदेखील कृषीमंत्र्यांना देत नवे कायदे रद्द न करण्याची मागणी करण्यात आली. हरयाणातील शेतकरी काही शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांकडे लक्ष देत त्या नव्या कायद्यांमध्ये सामील केल्या जाव्या असं या संघटनांचं म्हणणं होतं. पीएफओ आणि प्रगतीशील शेतकरी संघटना या एमएसपी आणि बाजार समित्यांच्या बाजूनं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.