जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रेवर अनंतनागमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे अपयश पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जम्मू काश्मीरमधील सरकारला घरचा आहेर दिला आहे. जम्मू काश्मीरमधील सरकार बरखास्त करण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीचे सरकार आहे. मात्र जम्मू काश्मीरमधील राज्य सरकार बरखास्त करुन तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

‘जम्मू काश्मीरमधील स्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्यातील सरकार बरखास्त करायला हवे. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आवश्यकता आहे,’ असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये लष्काराला विशेषाधिकार देणारा अफ्स्पा कायदा लागू करण्याची मागणीदेखील स्वामी यांनी केली आहे. याशिवाय ३७० कलम रद्द करुन जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा कायदा काढून घेण्यात यावा, असेदेखील सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. ‘आता आपण लष्कराच्या कारवायांसाठी तयार रहायला हवे. कारण आतापर्यंतच्या सर्व उपायांचा कोणताही उपयोग झालेला नाही,’ असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले.

अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर केलेल्या हल्ल्यात सातजणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. सोमवारी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी बालटल आणि मीर बझार यांच्या दरम्यान दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ९० आणि ४० व्या बटालियनच्या जवानांना तैनात करण्यात आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला असून काही ठिकाणी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजीदेखील करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तातडीने कॅबिनेटची बैठक घेत राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.