सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी आणि या प्रकरणाचा पुनर्तपास करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली हायकोर्टात याचिकेद्वारे केली आहे.

जानेवारी २०१४ मध्ये सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गुरुवारी दिल्लीतील हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. याप्रकरणाची कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी आणि दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा पुनर्तपास करावा अशी मागणी स्वामी यांनी याचिकेद्वारे केली आहे.

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूवर शंका उपस्थित होत होती. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे स्पष्ट झाल्याने सुनंदा यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालात सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाल्याचे म्हटले होते. दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०१५ मध्ये पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयचीदेखील मदत घेतली होती. पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य किरणोत्सर्गी घटकांमुळे झाला नाही असा अहवाल एफबीआयने दिला होता. पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानी लेखक आणि पत्रकार मेहेर तरार यांचीदेखील कसून चौकशी केली होती. सुनंदा पुष्कर या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पत्नी होत्या.