नितीश कुमार यांनी राजदला रामराम केल्यावर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. यानंतर दिल्लीहून सर्व सूत्रे हलवण्यात आली आणि बिहारमध्ये जदयू आणि भाजपने हातमिळवणी केली. या सगळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली असली, तरी बिहारमधील ‘छोट्या मोदींनी’देखील भाजपसाठी मोठी कामगिरी बजावली. भाजपचे हे छोटे मोदी म्हणजे सुशील कुमार मोदी. बिहार भाजपमधली महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री. सुशील मोदी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये भाजपसाठी अतिशय मोलाची भूमिका बजावली.

मागील ९० दिवसांपासून सुशील मोदी यांनी एकापाठोपाठ पत्रकार परिषदा घेऊन लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. याची परिणती अखेर बिहारमधील राजद आणि जदयुची आघाडी संपुष्टात येण्यात झाली. बुधवारी बिहारमध्ये जे राजकीय नाट्य घडले, त्यामागे सुशील मोदी यांचा मोठा हात आहे. त्यांच्यामुळेच जदयु आणि राजदच्या आघाडीला खिंडार पडले.

सुशील मोदी यांचे लालूप्रसाद यादव आणि कुटुंबीयांवरचे पाच आरोप:
१. लालूप्रसाद यादव यांच्याकडे १ हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचा आरोप सुशील मोदी यांनी केला होता. यावरुन लालूप्रसाद यादव यांनी सुशील मोदी यांच्यावर मानहानीचा दावा ठोकण्याची धमकी दिली होती. मात्र तरीही सुशील मोदी यांचे लालूंवरील हल्ले कायम होते.

२. तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरही सुशील मोदी यांनी अनेक आरोप केले. ‘२६ व्या वर्षी तेजस्वी यादव यांच्या नावावर २६ मालमत्ता आहे. १९९३ मध्ये म्हणजेच तेजस्वी यादव जेव्हा साडेतीन वर्षांचे होते, त्यावेळीच त्यांच्या नावावर दोन जमिनींची मालकी होती,’ असे आरोप सुशील मोदी यांनी केले होते. यासोबतच लालूप्रसाद यादव यांचे दुसरे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी अवैधपणे पेट्रोल पंप मिळवला, असा घणाघाती आरोपदेखील सुशील मोदी यांनी केला होता.

३. पाटण्यात बांधण्यात आलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या मालकीच्या मॉलबद्दलदेखील सुशील मोदी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मॉलच्या बांधकामापासून त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्यापर्यंत सुशील मोदी यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. यानंतर बिहार सरकारला उच्च न्यायालयात सादर कराव्या लागलेल्या प्रतिज्ञापत्रात लालूप्रसाद यादव यांचा मॉल पर्यावरणाच्या नियमांचा भंग करुन बांधण्यात येत असल्याची माहिती द्यावी लागली.

४. सुशील मोदी यांनी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर घणाघाती आरोप केल्यावर बेनामी संपत्ती आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाकडून कारवाईला सुरुवात झाली. लालूप्रसाद यांची मुलगी आणि खासदार मीसा भारती आणि त्यांचे पती यांच्या दिल्लीस्थित तीन फार्महाऊसवर अंमलबजावणी संचलनालयाने छापे टाकले. या प्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरोधात एफआयआर दाखल केले. लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित २१ ठिकाणी अंमलबजावणी संचलनालयाकडून छापे टाकण्यात आले.

५. सुशील मोदी आणि लालूप्रसाद यादव यांचे जुने नाते आहे. दोन्ही नेत्यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाला सुरुवात केली. १९७३ मध्ये सुशील मोदी पाटणा विद्यापीठाच्या महासचिवपदी निवडून आले. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी लालूप्रसाद यादव निवडून आले होते. १९९६ मध्ये लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात सुशील मोदींनी जनहित याचिका दाखल केली. याच माध्यमातून पुढे चारा घोटाळा उघडकीस आला.