News Flash

बलात्काराचा आरोप, माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांना अटक

महाविद्यालयीन तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष तपास पथकाने कारवाई करत केली अटक

(संग्रहित छायाचित्र)

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली आहे. महाविद्यालयीन तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष तपास पथकाने कारवाई करत त्यांना अटक केली आहे. शहाजहांपूर येथील आश्रमातून विशेष तपास पथकानं (एसआयटी) आज सकाळी चिन्मयानंद यांना अटक केली, त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते, तसंच एसआयटीचं पथक देखील रुग्णालयात होतं. जिल्हा रुग्णालयातून चिन्मयानंद न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्कार केल्याचा तसंच एक वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. यासंबंधीत एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओत एक व्यक्ती निर्वस्त्र होऊन मसाज करुन घेत असल्याचं दिसत आहे. ही व्यक्ती स्वामी चिन्मयानंद असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर चिन्मयानंद यांना अटक करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. या आरोपांनंतर गेल्या शुक्रवारी एसआयटीच्या पथकाने जवळपास सात तासांपर्यंत चिन्मयानंद यांची चौकशी केली होती.

याशिवाय, बुधवारी(१८) पीडित तरुणीने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, जर चिन्मयानंद यांना अटक नाही झाली तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. पीडित तरुणीने एसआयटीच्या तपासावर नाराजी व्यक्त करत चिन्मयानंद यांच्याविरोधात कारवाई कधी केली जाणार असा प्रश्न उपस्थित केला होता. तरुणीच्या या वक्तव्यानंतर एसआयटीने बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी, ‘एसआयटी कोणाच्या भावनांनुसार किंवा कोणाच्या अपेक्षेनुसार तपास करणार नाही. तथ्ये आणि विधानांच्या आधारे एसआयटी चौकशी करत आहे. तसंच सर्व बाजूंनी संयम साधण्याची गरज आहे’, असे एसआयटीचे आयजी नविन अरोरा म्हणाले होते.  २३ तारखेला या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल अशी माहिती त्यावेळी एसआयटीकडून देण्यात आली होती. पण त्यापूर्वीच आता चिन्मयानंद यांना अटक झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 10:20 am

Web Title: bjp leader swami chinmayanand arrested by up sit in shahjahanpur rape case sas 89
Next Stories
1 अमेरिका: वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी
Just Now!
X