भाजपचे खासदार वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधून भाजपचे खासदार असलेल्या वरुण गांधींनी याबद्दल अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र गांधी घराण्यातील सर्व सदस्य लवकरच एकत्र येतील आणि हे २०१९ च्या निवडणुकीआधी घडेल, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

गांधी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले आहे आणि लवकरच हे प्रत्यक्षात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते हाजी मन्झूर अहमद यांनी ‘इंडिया टुडे’ला दिली. ‘वरुण गांधी लवकरच काँग्रेसमध्ये दाखल होतील. ३५ वर्षांनी गांधी कुटुंब एकत्र येणार असून यामध्ये प्रियांका गांधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल,’ असेही अहमद यांनी सांगितले. भाजप खासदार वरुण गांधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे चुलत बंधू आहेत. संजय गांधी यांचे सुपुत्र असलेल्या वरुण गांधी यांना भाजपमध्ये फारसे महत्त्व दिले जात नाही.

वरुण गांधी यांनी अनेकदा पक्षाच्या आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. मात्र वरुण गांधी यांची आई मनेका गांधी या मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. वरुण गांधी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कधीही उघडपणे टीका केलेली नाही. त्यामुळे वरुण गांधी काँग्रेसवासी होऊ शकतात, असे मत उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य राम टंडन यांनी व्यक्त केले. वरुण यांनी अनेकदा पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षातून त्यांच्यावर टीकेची झोडही उठवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरुन त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. रोहिंग्यांच्या सुरक्षेची खातरजमा करुन त्यांना देशात आश्रय द्यावा, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या भूमिकेवर भाजपमधून जोरदार टीका झाली होती. ‘राष्ट्रीय हिताची काळजी असणारे लोक अशी विधाने करत नाही,’ अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी वरुण गांधींच्या विधानाला उत्तर दिले होते. अहिर यांच्या टीकेला वरुण गांधींनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिले होते. ‘रोहिंग्यांना आश्रय दिल्यास शरणार्थींबद्दलची भारताची भूमिका स्पष्ट होईल,’ असे वरुण यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

वरुण गांधी यांनी शेतकरी कर्जमाफी आणि त्यावरील राजकारणावरही टीका केली होती. कर्जमाफी दिल्यास आर्थिक शिस्त बिघडेल आणि कर्जाची परतफेड न करण्याची वृत्ती वाढेल. त्याचे विपरित परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतील, असा धोक्याचा इशारा वरुण यांनी दिला होता. १९९० पासून घेण्यात आलेल्या कर्जमाफीच्या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील पतपुरठ्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे वरुण गांधी यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात म्हटले होते. त्यांची ही भूमिकादेखील पक्षविरोधी होती.