कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने लोकांना खोटी आश्वासने दिल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला.
खारगोने येथील जाहीर सभेमध्ये त्या म्हणाल्या, राज्यातील गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी पाठविला होता. मात्र, शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने रचनात्मक कोणतेच काम केलेले नाही. केंद्र सरकारने पाठविलेला पैसा गेला कुठे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ शब्दांच्या बुडबड्याने लोकांचे पोट भरणार नाही, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
गरिबी आणि उपासमारी यांच्याविरोधात कॉंग्रेसचा लढा असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, गरिबांसाठी केंद्र सरकारने अन्नसुरक्षा योजना, माध्यान्ह भोजन योजना यासह इतर योजना अमलात आणल्या.
भाजपच्या काही नेत्यांना सध्या निवडणूक जिंकल्याची दिवास्वप्ने पडताहेत. मात्र, भारत इतर देशांसारखा नाही. त्यामुळे यांच्या स्वार्थी इच्छा कधीच पूर्ण होणार नाहीत, अशी टीका सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.