दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर व भाजपा आमदार प्रसाद लाड आदींनी रात्री पोलीस ठाणे गाठले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना कारवाईवरुन जाब देखील विचारला. एवढच नाहीतर भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले. या घटनेवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कारण, सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून फडणवीस, दरेकर यांच्यासह भाजपावर जोरदार टीका केली जात असून, भाजपा नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली जात आहे. सत्ताधारी पक्ष व भाजपाच्या नेत्यांमध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणाची दखल काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधींनी देखील घेतल्याचे समोर आले आहे.

प्रियंका गांधी यांनी पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांवर टीका करणारे ट्विट करत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्या रात्री पोलिसांना खडसावत असल्याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; फडणवीस आणि दरेकरांकडून पोलिसांची खरडपट्टी

”जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत आणि असंख्य लोक जीव वाचवण्यासाठी कोणत्याही प्रकारे एक बॉटल रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यावेळी जबाबदार पदावर राहिलेले भाजपा नेत्याचे रेमडेसिवीरची साठेबाजी करण्याचे कृत्य मानवते विरोधात गुन्हा आहे.” असं प्रियंका गांधींनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

“केंद्र सरकारने फडणवीसांना ‘रेमडेसिवीर’ची साठेबाजी आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का?”

तर, याप्रकरणी काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.  ”मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्याला सोडवले आणि तो साठा भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीने मिळवल्याचा दावा केला. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खासगी व्यक्तीला करता येत नाही तर मग फडणवीस यांनी परवानगी कशी काय मिळवली? केंद्रीय मंत्र्यांने भाजपा आणि फडणवीसांना रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का?” असा प्रश्न उपस्थित करून, ”महामारीच्या काळात साठेबाजांवर पोलीस कारवाई करत असताना त्यात हस्तक्षेप करण्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून दबाव टाकणाऱ्या देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी’,’ अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केलेली आहे.

“रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे माणसं मरत असताना मुंबई पोलिसांनी साधी चौकशीही करु नये का?”

“एका व्यावसायिकासाठी देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर मध्यरात्री धाऊन जातात आणि मुंबई पोलिसांवर दबाव आणतात हे आश्चर्यकारक आहे. महामारीमध्ये रेमडेसीवीरचा तुटवड्यामुळे माणसं मरत असताना मुंबई पोलिसांनी साधी चौकशीही करु नये का?” असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपा नेत्यांना केलेला आहे.

“मुख्यमंत्री कट्टीबट्टीचा डाव खेळत आहेत; रूग्णांच्या मृत्यूंना राज्य सरकारच जबाबदार”

तर, प्रियंका गांधींच्या या ट्विटवर आज पत्रकारपरिषदेत बोलतान भाजपा प्रदेश उपाध्य प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज सर्वप्रथम या प्रकरणी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केल्याचं समोर आलं. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची भीती एवढी निर्माण झाली आहे की, राष्ट्रीय पातळीवर देखील यांना दखल घ्यावी लागत आहे. हे प्रियंका गांधी यांच्या ट्विट वरून स्पष्ट झालं आहे.” असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.