News Flash

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला; कारवर तुफान दगडफेक

कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात असताना हल्ला

पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळालं आहे. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते.

कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला असून दगडफेक करण्यात आली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांचा ताफा जात असताना रस्त्यावर निषेध करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत असल्याचं दिसत आहे. तसंच दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये गाडीमध्ये आलेला दगडही त्यांनी दाखवला आहे.

“बंगाल पोलिसांना जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस अपयशी ठरली. पोलिसांसमोर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याआधी दिलीप घोष यांनी बुधवारी जे पी नड्डा उपस्थित असणाऱ्या भाजपाच्या कार्यक्रमात योग्य सुरक्षा नसल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला होता.

भाजपाने केलेल्या आरोपांवर तृणमूल काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून पक्षाचे नेते मदन मित्रा यांनी म्हटलं आहे की, “त्यांचेच गुंड हिंसाचार करत आहेत”. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. हा सर्वसामान्यांना निषेध होता असं ते म्हणाले आहेत. दुसरीकडे टीएमसीचे नेते हकीम यांनी भाजपा बाहेरील लोकांना राज्यात आणत असून राज्य सरकारला याची माहितीही देत नसल्याचा आरोप केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 2:09 pm

Web Title: bjp leaders jp nadda kailash vijayvargiya convoys attacked in bengal sgy 87
Next Stories
1 “चित्रपटातील आयटम डान्स, जाहिराती आणि पॉर्न बलात्काराची मानसिकता निर्माण करतात”
2 धक्कादायक, SFJ कडून भारतीय लष्करातील शीख सैनिकांना बंडासाठी चिथावणी देण्याचा प्रयत्न
3 पोटाला चिमटा बसल्यावरच शेतकरी रागानं रस्त्यावर येतो : अजित पवार
Just Now!
X