दिल्लीमध्ये येत्या सोमवारी होणाऱ्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीनंतर एनडीए सरकार केंद्रातील कारभाराची सुत्रे हाती घेईल. याच पार्श्वभूमीवर नव्या मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या दृष्टीने भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दिल्लीतील गुजरात भवनात मोदींचे विश्वासू अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांनी एकत्रितपणे नरेंद्र मोदींची भेट घेतली. शहा यांनी त्यानंतर राजनाथ सिंह यांचीसुद्धा भेट घेतल्याचे समजते. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते वैंकय्या नायडू आणि झाशी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विजयी उमेदवार उमा भारती यांनीसुद्धा गुजरात भवनात जाऊन मोदींची भेट घेतल्याने दिल्लीतील घडामोडींना वेग आल्याचे दिसून आले.   तसेच केंद्रीय मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसुद्धा नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे समजत आहे.  केंद्रीय मंत्रिपद मिळण्याच्या आशेने सध्या दिल्लीतील  गुजरात भवन आणि अशोका रोड येथील राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी इच्छुकांचा राबता लागला आहे. मंत्रिपदाच्या आशेने दिल्लीत दाखल होणाऱ्या अन्य नेत्यांमध्ये मनेका गांधी, उदित राज, दिल्ली राज्यसभेचे सभासद विजय गोयल यांचा समावेश होता.