निवृत्तीच्या दिवशी उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांच्यावर भाजप नेत्यांचे शरसंधान

एकीकडे मावळते उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनी राज्यघटनेचे कसोशीने पालन केल्याचे कौतुकोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी काढत असताना दुसरीकडे भाजप नेते त्यांच्यावर तोफा डागत असल्याचे चित्र गुरूवारी दिसले. विशेष म्हणजे आज उपराष्ट्रपतिपदाची शपथ घेणार असलेल्या व्यंकय्या नायडू यांनीही नाव न घेता अन्सारींवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

सलग दोनदा उपराष्ट्रपतिपद आणि राज्यसभा अध्यक्षाचे पदसिद्ध पद भूषविल्यानंतर अन्सारी यांना सन्मानजनक निरोपसोहळा राज्यसभेत रंगला होता. त्यात मोदींपासून बहुतेक पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. तुमच्याशी माझा फारसा परिचय नाही, असे सांगत मोदी म्हणाले, “उपराष्ट्रपतिपदाचा एकेक क्षण तुम्ही फक्त आणि फक्त राज्यघटनेच्या चौकटीबरहुकूमच वागण्याचा प्रय केला. परराष्ट्र धोरणातील तुमची समज आणि त्यातील बारकावे समजावून सांगण्याचा मला खूप फायदा झाला.

तुमच्या मनात काहीशी तगमग असू शकते. पण आजपासून तुमच्यावर ते संकट नसेल. मुक्तीचा आनंद तुम्हाला मिळेल आणि तुमचे जे मूलभूत विचार आहेत, त्याप्रमाणे बोलण्याची आणि कार्य करण्याची संधीही मिळेल,” असेही मोदी बोलले. पण त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. मोदींनंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, सभागृह नेते अरूण जेटली, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेकांची गौरवपर भाषणे झाली.

सभागृहात असा कौतुकसोहळा चालू असताना संसदेबाहेर मात्र भाजप नेत्यांच्या टीकेला अन्सारींना सामोरे जावे लागले. निवृत्तीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या मुलाखतीत अन्सारींनी वाढत्या असहिष्णुतेने व कायदा हातात घेण्याच्या वृत्तीने मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याची टिप्पणी केली होती. तसेच देशभक्तीवर शंका घेण्याच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. अन्सारींचे हे मतप्रदर्शन भाजपला चांगलेच झोंबले. सरचिटणीस कैलास विजयवर्गीय म्हणाले, “मी त्यांच्या विधानांचा निषेध करतो. अजूनही उपराष्ट्रपती असताना अशी विधाने करणे त्यांना अजिबात शोभत नाही. त्यांनी पदाची अप्रतिष्ठा केली. कदाचित निवृत्तीनंतर राजकीय आश्रय मिळविण्याचा त्यांचा हेतू असावा.” भाजपचे दुसरे नेते शाहनवाज हुसेन म्हणाले, ” या देशात मुस्लिम अजिबात असुरक्षित नाहीत. भारतासारखा सुरक्षित देश आणि हिंदूसारखे मित्र मुस्लिमांना कधीच मिळणार नाहीत.

व्यंकय्यांच्या टीकेने आश्चर्य

भाजप नेत्यांची टीका समजण्यासारखी होती; पण मावळत्या उपराष्ट्रपतींवर ‘उगवत्या’ उपराष्ट्रपतींनी केलेल्या टीकेने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अन्सारींनी निवृत्तीच्या पूर्वसंध्येला टीका केली, तर नायडूंनी पदग्रहणाच्या पूर्वसंध्येला अप्रत्यक्षरीत्या प्रतिटीका केली. भारतासारखा सहिष्णु देश जगात दुसरा नाही. तरीही काही लोक राजकीय स्वार्थांसाठी अल्पसंख्यांकांचे मुद्दे उपस्थित करतात. भारताची बदनामी करण्यासाठी छोटय़ा गोष्टींना मोठे रूप देतात, असे नायडू म्हणाले.

एवढी टोकाची विविधता असतानाही भारत देश कशामुळे प्रगती करतोय, हा प्रश्न मला नेहमी पडतो. भारताचा इतिहास पाहिला तर देशाला वेळोवेळी आव्हानांचा, संकटांचा सामना करावा लागला; पण तरीही देश पुढे जात राहिला तो डॉ. हमीद अन्सारी यांच्यासारख्या महान व्यक्तींनी देशाला वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनांमुळे..  डॉ. मनमोहनसिंग, माजी पंतप्रधान