दादरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात भाजपच्या नेत्याच्या मुलाचे नाव असून गुन्ह्य़ाची बव्हंशी जबाबदारी त्याच्याकडेच जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ऊर्वरित आरोपींविरोधात दंगलीत सहभागी झाल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
आरोपपत्रात स्थानिक भाजप नेते संजय राणा यांचा मुलगा विशाल याचे नाव ठळकपणे अधोरेखित होत असल्याचे ग्रेटर नोएडाचे पोलीस अधीक्षक संजय सिंग यांनी सांगितले. तसेच या हत्याकांडात मृत्युमुखी पडलेले मोहंमद अखलाक यांच्या फ्रिजमधील मांस नेमके कशाचे होते, याबाबतचा न्यायवैद्यक अहवाल अजून पोलिसांना प्राप्त झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. विशालसह १५ जणांविरोधात स्थानिक दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात या प्रकरणी गुरुवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी ४ जानेवारी रोजी होईल. त्या वेळी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती अखलाक यांच्या कुटुंबाचे वकील युसूफ सैफी यांनी दिली. या प्रकरणातील दोघा आरोपींनी अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. त्यातील एकाचे वय प्रत्यक्षात २० वर्षे असताना त्याने आपले वय १६ असल्याचा दावा करणारे प्रमाणपत्र सादर केले आहे, तर दुसऱ्याच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
या घटनेत गंभीर जखमी झालेला अखलाक यांचा मुलगा दानिश याचा कबुलीजबाब नोंदवण्यात आला असला, तरी तो सुनावणीच्या नंतरच्या टप्प्यात न्यायालयाला सादर करणार असल्याची माहिती सैफी यांनी दिली.