पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून भाजपचे नेते किश्तवारमधील परिस्थितीचा गैरफायदा घेत असून तेथील लोकांना ते भडकावत आहेत, या शब्दांत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली.
शुक्रवारी झालेल्या हिंसाचारास जे जबाबदार असत्       ोील त्यांच्यावर कडक कारवाईचे सूतोवाच करतानाच लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ओमर अब्दुल्ला यांनी केले. मुख्य प्रवाहातील पक्षांसह कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते किंवा फुटीरवादी गटांचे नेते हिंसाचारग्रस्त भागात गेल्यास तेथील परिस्थिती अधिकच चिघळण्याच्या शक्यतेमुळे त्यांना तेथे जाऊ न देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. हा निर्णय अरुण जेटली यांनाही लागू पडतो, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
कोणत्याही राजकीय पक्षाचा नामोल्लेख न करता काही नेते जम्मूमधील परिस्थिती भडकावण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका ओमर यांनी केली. २००८ मध्ये अमरनाथच्या जमिनीवरून झालेल्या तणावासारखीच परिस्थिती पुन्हा उत्पन्न करण्याचा त्यांचा इरादा असल्याचा आरोप ओमर अब्दुल्ला यांनी केला. त्यायोगे संसद आणि विधानसभा निवडणुकीत मते मिळविण्यासाठी त्याचा उपयोग करण्याचा त्यांचा विचार असावा, असे ओमर म्हणाले.
यासंदर्भात विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्याशी आपण दूरध्वनीवरून बोललो असून तुमच्या नेत्यांनी येथे येऊन परिस्थिती भडकावू नये, असे आपण त्यांना सांगितले असल्याचे अब्दुल्ला म्हणाले.