एमडीएमकेचे नेते वायको यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका सुरूच ठेवली तर ते सुरक्षितपणे घरी जाऊ शकणार नाहीत, असे वक्तव्य भाजपचे चिटणीस एच.राजा यांनी केल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस व माकपने या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावरून तमिळनाडूत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत.
नेपाळमधील सार्क परिषदेत मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांना तिसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर संतापलेल्या वायको यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. मोदींनी राजशिष्टाचाराच्या मर्यादा ओलांडल्या असल्याचा आरोप वायको यांनी केला. वायको यांच्या टीकेला उत्तर देताना भाजपच्या चिटणीसांनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप माकप व काँग्रेसने केला आहे. राजा यांचे हे मत म्हणजे पक्षाचे नव्हे अशी सारवासारव भाजपच्या तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष टी सुंदरराजन यांनी केली आहे. मोदींवर टीका करणे वायको यांनी थांबवावे, अशी विनंती त्यांनी वायको यांना केली आहे.
वायको यांचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. त्याच बरोबर मोदी हे १२२ कोटी भारतीयांसाठी सामान्य आहेत. त्यांच्यावर टीका करू नये असा काही नियम नाही, असे पीएमकेचे संस्थापक एस रामदॉस यांनी सांगत भाजपला टोला लगावला. भाजपने टीका ऐकावी असा सल्ला त्यांनी दिला. पीएमकेदेखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहे.