मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याजागी तात्पुरते पर्यायी नेतृत्व देण्यात यावे यासाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीकड़ून दबाव वाढत चालला आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष भाजपाचा गोव्यातील जुना मित्र पक्ष आहे. मनोहर पर्रिकर यांच्या आजारपणामुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. पर्रिकरांनी मुख्यमंत्री कार्यालयात पुन्हा रुजू व्हावे यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्यावर दबाव वाढत चालला आहे असा दावा आरएसएसचे गोव्यातील एकेकाळचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

मनोहर पर्रिकरांना पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. पण अशा परिस्थितीत भाजपा हायकमांडकडून त्यांच्यावर अनावश्यक दबाव आणला जात आहे. हे दुर्देव आहे. काहीही करुन भाजपाला गोवा आपल्या ताब्यात ठेवायचे आहे. त्यांना गोव्याची सत्ता सोडायची नाहीय. त्यासाठी पर्रिकरांवर दबाव आणला जातोय. त्यामुळे त्यांची तब्येत आणखी बिघडत चाललीय असे वेलिंगकर बुधवारी पणजीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

गोवा भाजपा प्रमुख विनय तेंडुलकर यांनी वेलिंगकरांचे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपा हायकमांडकडून पर्रिकरांवर कोणताही दबाव आणला जात नाहीय. त्यांची तब्येत सुधारतेय ते नोव्हेंबरमध्ये कार्यालयात रुजू होतील असे तेंडुलकर म्हणाले. भाजपा आता विचारधारेवर चालणारा पक्ष राहिलेला नाही. निवडून आलेल्या प्रतिनिधींना पक्षाच्या विचारधारेशी काहीही देणेघेणे नाहीय असे वेलिंगकर म्हणाले. सत्तेचे भुकेले भाजपा नेते पर्रिकरांना आरामही करु देत नाहीत असे सुभाष वेलिंगकर म्हणाले.