दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी रविवारी राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. रजनीकांत यांच्या चाहत्यांची संख्या पाहता त्यांचा राजकारणातील प्रवेश आगामी काळात तामिळनाडूतील अनेक समीकरणांवर प्रभाव टाकेल. राजकीय विश्लेषकांच्या मते, रजनीकांत यांच्या पक्षामुळे राज्यातील अस्मितेच्या मुद्द्यावर राजकारण करणारे लहान प्रादेशिक पक्षांसमोर नवे आव्हान निर्माण होईल. तर ‘द्रमुक’सारख्या प्रस्थापित पक्षांनाही काहीप्रमाणात याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, याबरोबरच राजकीय विश्लेषकांमध्ये आणखी एक मुद्दा चर्चेत आहे , तो म्हणजे रजनीकांत यांची भाजपशी असलेली जवळीक. एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत रजनीकांत यांच्या पक्षाला अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा फायदा होऊ शकतो. मात्र, त्याचवेळी रजनीकांत यांची भाजपशी असलेली जवळीक त्यांच्या राजकीय लोकप्रियतेला मारक ठरू शकते.

चेन्नईत रविवारी झालेल्या जाहीर सभेत रजनीकांत यांनी स्वत:ची राजकीय दिशा स्पष्ट केली. आमचा पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागांवर उमेदवार उभे करेल. मात्र, लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय आम्ही तेव्हाची परिस्थिती पाहून घेऊ, असे रजनीकांत यांनी सांगितले होते. त्यानंतर लगेचच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तमिलसाई सुंदरराजन यांनी एक सूचक वक्तव्य केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी रजनीकांत यांचा पक्ष एनडीएचा भाग असेल, असे तमिलसाई सुंदरराजन यांनी सांगितले. यामुळे पुढील निवडणुकांमध्ये ‘डीएमके’ विजयी होण्याची शक्यताच संपुष्टात येईल असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच, तामिळनाडूमध्ये नवीन राजकीय समीकरणे बनण्याची शक्यतादेखील उरणार नाही असा दावा सुंदरराजन यांनी केला आहे. ए. राजा आणि कणिमोही यांची टूजी घोटाळ्यातून झालेली मुक्तता, तसेच जयललिता यांच्या पश्चात एआयडीएमकेची होत असलेली वाताहत या पार्श्वभूमीवर सुंदरराजन यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानण्यात येत असून भाजपा व रजनीकांत यांच्या पक्षाची आघाडी विरूद्ध डीएमके अशी लढत आगामी निवडणुकीत बघायला मिळेल असे संकेत मिळत आहेत.

याविषयी द्रमुकचे कार्य़कारी अध्यक्ष एम के स्टालिन यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, रजनीकांत यांच्या पक्षामुळे द्रमुकचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे आम्हाला त्यांच्या राजकारणातील प्रवेशाशी काहीही देणेघेणे नाही. आमच्या पक्ष नियोजित पद्धतीने काम करणे सुरूच ठेवेल, असे स्टालिन यांनी सांगितले. मात्र, आर.के.नगरमधील पोटनिवडणुकीत नुकताच अण्णाद्रमुककडून झालेला पराभव आणि एकूणच परिस्थिती पाहता रजनीकांत यांच्यासारखा आणखी एक तगडा विरोधी नेता द्रमुकसाठी डोकेदुखी ठरू शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.