राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. तर आणखी काही आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातंय. निवडणुकीपूर्वी आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेसनं आपल्या ४० आमदारांना रातोरात विमानानं बंगळुरूला पाठवलं आहे. राज्यसभा निवडणुकीपर्यंत त्यांना तेथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अहमदाबादहून ३१ आमदार काल रात्री उशिरा विमानानं बंगळुरूला पोहोचले. त्यानंतर राजकोटहून ९ आमदारही बंगळुरूला पहाटे पाच वाजताच्या सुमारास पोहोचले. बंगळुरूतील एका रिसॉर्टमध्ये काँग्रेसच्या आमदारांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं. काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे. तो यशस्वी होऊ नये यासाठी आमदारांना बंगळुरूला पाठवण्यात आलं आहे, असं एका आमदारानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. पैशांची लालूच आणि पोलिसांचा दबाव आदी माध्यमातून काँग्रेस आमदारांना फोडण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, गुजरात विधानसभेत एकूण १८२ जागा आहेत. त्यात १२१ भाजप आणि अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे ५७ आमदार होते. राष्ट्रवादीचे दोन, जेडीयू आणि जीपीपीचा प्रत्येकी एक आमदार आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी किमान ४६ मतांची आवश्यकता असते. पण परिस्थिती बदलली आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिल्याने १७६ सदस्य आहेत. त्यामुळं उमेदवाराला विजयासाठी ४५ मतांची आवश्यकता आहे. तत्पूर्वी गुरुवारी काँग्रेसच्या तीन आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले होते. त्यानंतर आणखी तिघांनीही राजीनामे दिले आहेत.