केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत मांडलेल्या हिंदूू दहशतवादाच्या मुद्दय़ावरून काँग्रेसने शनिवारीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्रातील भाजप सरकार देशाचे ध्रुवीकरण करत असून, हे समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न आहेत, असा आरोप काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. राजनाथ सिंह यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याची टीका माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. तर ‘हिंदूू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग संसदेमध्ये केला नाही, असे स्पष्टीकरण माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले.
काँग्रेसने हिंदू दहशतवादाची संकल्पना मांडून देशातील दहशतवादाविरोधातील लढा कमकुवत केला, असा आरोप राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी संसदेत केला होता. त्यावर कॉंग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले. ‘गृहमंत्र्यांनी देशातील जनतेत फूट पाडण्यासाठी मुद्दाम हे विधान केले व दोन धर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच काश्मीर, पंजाब, ईशान्येकडील राज्यातील दहशतवादाविरोधात उभा राहिला आहे. आमच्या नेत्या इंदिरा गांधी या दहशतवादामुळेच हुतात्मा झाल्या. माजी पंतप्रधान राजीव गांधीही दहशतवादाचे बळी ठरले होते. भाजप सरकार आल्यानंतर जम्मू-काश्मीरसह देशात ध्रुवीकरण झाले आहे,’ असे आझाद यांनी सांगितले.
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा रोख मालेगाव, मक्का मशीद व इतर प्रकरणातील उजव्या अतिरेकी गटांवर होता. काही प्रकरणातील आरोपींचे संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी होते व तो चौकशीचा भाग होता, असे प्रत्युत्तर पी. चिदंबरम यांनी दिले.
अपयश झाकण्यासाठीच केंद्र सरकार हिंदूू दहशतवाद हा शब्दप्रयोग करीत असल्याचा आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. जयपूर येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात ‘हिंदूू दहशतवाद’ हा शब्द वापरला होता. मात्र ‘दहशतवादाला धर्म नसतो’ या भूमिकेतून दुसऱ्याच क्षणी आपण हा शब्द मागे घेतला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची निष्क्रियता लपविण्याच्या उद्देशातूनच हिंदूू दहशतवाद हा शब्द वापरला गेला असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
कंदहार विमान अपहरण प्रकरणानंतर देशाची परिस्थिती बदलली. या घटनेमुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढले. संसदेवर, लाल किल्ल्यावर आणि जम्मू-काश्मीर विधानसभेवर हल्ले हे त्याचेच द्योतक आहे. देशात अतिरेकी घुसतात, हल्ले होतात. पण त्यावर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारला अपयश येत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली. दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या टीकेला भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची निष्क्रियता लपविण्याच्या उद्देशातूनच हिंदूू दहशतवाद हा शब्द वापरला गेला आहे. मी असा शब्द संसदेत वापरला नव्हता.
सुशीलकुमार शिंदे

मालेगाव, मक्का मशीद व इतर बॉम्बस्फोट प्रकरणात उजव्या अतिरेकी गटांवर संशय होता. काही आरोपींचा संघाशी संबंध होता. तो चौकशीचा भाग होता. याचा विपर्यास केला गेला.
पी. चिदंबरम
काश्मीर, पंजाब, ईशान्येकडील राज्यातील दहशतवादाविरोधात कॉंग्रेस उभा राहिला आहे. इंदिरा गांधी या दहशतवादामुळेच हुतात्मा झाल्या. राजीव गांधीही त्याचे बळी ठरले होते. भाजप सत्तेत आल्यानंतर देशात ध्रुवीकरण झाले आहे.
गुलाम नबी आझाद

काँग्रेसवर
पुन्हा हल्ला

लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनेला स्थानिकांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यापेक्षा मूलतत्त्ववादी हिंदू गटांकडून अधिक धोका असल्याचे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी २०१०मध्ये केले होते, त्याचा उल्लेख करून भाजपने शनिवारी काँग्रेसवर हिंदू दहशतवादाच्या संदर्भात नव्याने हल्ला चढविला.