पश्चिम बंगालमध्ये येत्या शनिवारी अर्थात १७ एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्यासाठीची आचारसंहिता लागू झालेली असताना अभिनेते आणि भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी १५ एप्रिल रोजी घेतलेल्या आपल्याच एका प्रचार रॅलीचा व्हिडीओ शेअर केला आहे. बराकपोरामध्ये झालेल्या रॅलीचा हा व्हिडीओ असून त्यासोबत मनोज तिवारी यांनी लोकांना घरांमध्येच राहण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे! विशेष म्हणजे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लोकांची अलोट गर्दी दिसत असून सोशल डिस्टन्सिंगच्या सर्वच नियमांचा फज्जा उडाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

 

भारतात गेल्या महिन्याभरात मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांकडून देखील अधिक सतर्कता घेतली जात असून इतर राज्यांना देखील सतर्कता घेण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. मात्र, असं असताना निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये प्रचारसभांमधून मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याचं समोर येत आहे. मनोज तिवारी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळत आहे.

 

हा व्हिडीओ १५ एप्रिलचा असून आपल्या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आधी लोकांच्या प्रतिसादाचं कौतुक करताना दिसत आहेत. आणि पुढच्याच ओळीत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत. “बराकपूर रोड शो..१५ एप्रिल…अद्भुत समर्थन… मित्रांनो, आम्ही प्रचार नक्कीच करतो आहोत कारण निवडणुकीला कोणता पर्याय नाही. पण करोनाला घाबरणं गरजेचं आहे. खूपच गरजेचं नसेल, तोपर्यंत घराबाहेर पडू नका. जर बाहेर निघालातच, तर तोंडाला मास्क आणि इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा”, असं आवाहन मनोज तिवारी यांनी ट्वीटमध्ये केलं आहे.