बिहारमध्ये तीन टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. प्रारंभी जे केले आले, त्यामध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने मोठी आघाडी घेतली होती. पण आता भाजपा प्रणीत एनडीए पुढे आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये बरेच अंतर आहे. भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने एकत्र निवडणूक लढवली असली, तरी त्यांच्यातही एक स्पर्धा होती.

सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार बिहारमध्ये भाजपाला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळू शकतात. हाच कल कायम राहिला तर बिहारमध्ये भाजपा मोठा भाऊ बनू शकतो. जेडीयूपेक्षा भाजपाचे उमेदवार जास्त जागांवर आघाडीवर आहेत. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. दोन्ही पक्षांनी निम्म्या जागा वाटून घेतल्या.

आणखी वाचा- Bihar Election Results : “राहुल गांधींनी ज्यांच्यासोबत हात मिळवला ते डुबले”

भाजपाने १२१ जागा तर जेडीयूने १२२ जागा लढवल्या. हा कल असाच कायम राहिला तर प्रथमच बिहार एनडीएमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल. २०१५ मध्ये भाजपा आणि जेडीयूने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. जेडीयूने काँग्रेस आणि राजदसोबत आघाडी करुन ७१ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाला फक्त ५३ जागा जिंकता आल्या होत्या.