03 March 2021

News Flash

‘बुआ-भतिजा’ देणार धक्का, २०१९मध्ये उत्तर प्रदेशात ५० जागांवर भाजपाच्या पराभवाची शक्यता

भाजपाला २०१९ मध्ये फक्त २३ जागांवर समाधान मानावे लागेल

भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

गोरखपूर आणि फुलपूरमधील पोटनिवडणुकीत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्याने भाजपाचा पराभव झाला. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपाचा उत्तर प्रदेशमधील ५० जागांवर पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फुलपूरमधील पोटनिवडणुकीत ‘बुआ-भतिजा’ हे नवे राजकीय समीकरण उदयास आले. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी एकत्र येऊन भाजपाचा रथ रोखला. आता २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७३ जागांवर विजय मिळाला. नरेंद्र मोदींना मिळालेल्या अभूतपूर्व बहुमतामध्ये उत्तर प्रदेशचे मोठे योगदान होते. मात्र, २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील राजकीय गणित बदलण्याची दाट शक्यता आहे.

उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४०३ जागांपैकी समाजवादी पक्षाला ४७ तर बहुजन समाज पक्षाला फक्त १९ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला फक्त ७ जागांवर समाधान मानावे लागले. तर उत्तर प्रदेशातील छोट्या पक्षांशी युती करत भाजपाने तब्बल ३२५ जागांवर विजय मिळवला. बसपा आणि सपा हे दोन्ही पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढले होते. पण  २०१९ मध्ये सपा-बसपा आघाडीमुळे भाजपाचा  ५० जागांवर पराभव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१७ मध्ये भाजपाला मिळालेली मते आणि सपा-बसपा उमेदवारांना मिळालेली मते याची तुलना केल्यानंतर ही आकडेवारी समोर येते. भाजपाला २०१९ मध्ये फक्त २३ जागांवर समाधान मानावे लागेल, असे चित्र सध्या तरी दिसते. त्यामुळे भाजपासाठी २०१९ मधील निवडणूक आव्हानात्मक ठरेल, असे दिसते.

बिहारमध्येही भाजपाविरोधात नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र आल्यानंतर भाजपाचा पराभव झाला होता. काँग्रेसनेही हीच गोष्ट हेरून विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. विरोधक एकत्र आल्यास भाजपाचा पराभव शक्य असल्याचे स्पष्ट झाल्याने सपा- बसपा आघाडीची शक्यता जास्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 8:34 am

Web Title: bjp may lose 50 seats in 2019 loksabha elections because of sp bsp alliance
Next Stories
1 काश्मीरमध्ये केवळ सैन्याच्या बळावरच शांती शक्य
2 डोनाल्ड ट्रम्प यांची सुन आणि मुलगा विभक्त होणार, वेनेसा ट्रम्पचा घटस्फोटासाठी अर्ज
3 आयआयटीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Just Now!
X