कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. १२ मे रोजी कर्नाटकात मतदान होणार आहे. काँग्रेस, भाजपा आणि जनता दल (सेक्यूलर) यांच्यात यावेळी मुख्य लढत असणार आहे. मतदानादिवशी मतदार तिन्ही पक्षांचं नशीब ठरवतील. सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार असून, कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा अजून एक राज्य मिळवण्यात यशस्वी ठरणार का ? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र पोलनुसार, काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष सरकार आणण्यासाठी गरज असणाऱ्या ११३ जागा जिंकू शकणार नाहीत.

कर्नाटक विधानसभा निवडणूक लक्षात घेता टाइम्स नाऊने पोल ऑफ पोल्स केला आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या पोल्सना एकत्र करुन हा पोल करण्यात आला आहे. तीन पोल्सच्या आधारे ही आकडेवारी काढण्यात आली आहे. या पोलनुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. २२४ जागांच्या विधानसभेत काँग्रेस ९३ जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या २३ एप्रिलच्या सर्व्हेनुसार काँग्रेस ९१ जागा जिंकू शकतं. तर जैन युनिव्हर्सिटी आणि सीएसडीएसने केलेल्या सर्व्हेत काँग्रेसला ८८ जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीटीव्ही आणि एनजीच्या सर्व्हेत काँग्रेस ८० जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे तिन्ही पोल्सच्या आधार काढण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपा ८७ जागा जिंकू शकतं. टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या सर्व्हेनुसार भाजपा ८९, जैन युनिव्हर्सिटी आणि सीएसडीएसनुसार ९२ आणि एनडीव्ही-एनजीच्या सर्व्हेत भाजपा ८० जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

बहुजन समाज पक्षासोबत युती करत निवडणुकीत उतरलेल्या जनता दलासमोर (सेक्यूलर) मात्र आव्हान कायम असणार आहे. हा पक्ष गेल्या १० वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. पोल ऑफ पोल्सच्या भविष्यवाणीनुसार, जनता दल (सेक्यूलर) ३८ जागाच जिंकू शकतं. टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या सर्व्हेनुसार ४०, जैन युनिव्हर्सिटी आणि सीएसडीएसनुसार ३५ आणि एनडीव्ही-एनजीने ३८ जागांची भविष्यवाणी केली आहे. कर्नाटकात १२ मे रोजी मतदान असून १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.