भाजपाला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त २०० जागा मिळतील असा अंदाज स्वराज पक्षाचे प्रमुख आणि राजकीय निरीक्षक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे. प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाला पूर्वेकडे १५-२० जागा भाजपाला मिळतील मात्र तेवढ्या पश्चिम भारतात घटतील असंही ते बोलले आहेत.

‘हिंदी पट्ट्यात भाजपाला चांगलाच फटका बसेल असा अंदाज असून भाजपाला २०१४ च्या तुलनेत १०० जागा कमी मिळतील. भाजपाला १५० ते २०० च्या आसपास जागा मिळतील असं सध्या तरी चित्र आहे. भाजपाला १५० जागा मिळाल्या तर हातातून सत्ता जाण्याची शक्यता आहे. मात्र जर २०० जागा आल्या तर इतर पक्षांची सोबत घेऊन सत्ता स्थापन करु शकतात’, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.

भाजपाला किती जागा मिळतात यामध्ये ग्रामीण अस्वस्थता, बेरोजगारी आणि राफेल करार हे महत्त्वाचे मुद्दे ठरतील असं मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या ८३ जागा असून विधानसभेच्या निवडणुकीवरून हिंदी पट्ट्यातील मतांची कल्पना येते असंही योगेंद्र यादव बोलले आहेत.

राजस्थानमध्ये लोकांना सत्ताबदल करायचा होता हे स्पष्ट झालं. पण इतर राज्यांमध्ये तसं चित्र नव्हतं. काँग्रेसने तळागळापर्यंत जाऊन प्रचार केला ज्याचा त्यांना फायदा झाला. ग्रामीण भाग व शेतकऱ्यांचाही भाजपावर काही प्रमाणात रोष होता असं योगेंद्र यादव यांनी सांगितलं आहे. छत्तीसगडमध्ये २५०० रुपयात धान्यखरेदीचं आश्वासन काँग्रेसला फायद्याचं ठरलं. शेतकऱ्यांनी धान्याची विक्री निकाल लागेपर्यंत थांबवली यावरून हे स्पष्ट होतं असं योहेंद्र यादव यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या रोषामुळेच भाजपाचा पराभव झाल्याचं मत सगळीकडे व्यक्त होत आहे. परिणामी आता प्रत्येक राज्य शेतकऱ्यांच्या भल्यासाठी विविध सवलतींचा वर्षाव करत आहे. जे चार वर्षात राजकारणी शिकले नाहीत ते चार दिवसांत शिकल्याचं बघायला मिळालं असा टोला योगेंद्र यादव यांनी यावेळी लगावला आहे.

शेतकऱ्यांसाठी काय केलंय हे दाखवण्यासाठी भाजपाकडे काहीही नाही. बेरोजगारीचं प्रमाण एकूण पाच टक्के असून पदवीधारकांमध्ये तब्बल १६ टक्के बेरोजगारी आहे जे सर्वोच्च आहे. हे दोन प्रश्न मोदी सरकारचं भविष्य ठरवणार असून विरोधक याचा कसा फायदा उचलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे असं योगेंद्र यादव बोलले आहेत.

राफेलबाबत कॅगकडे तसा रिपोर्ट नसताना सर्वोच्च न्यायालयानं असं कसं म्हटलं हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे भाजपा विषय बदलायचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. राम मंदिर, भारत-पाकिस्तान, हिंदू-मुस्लीम, मोदी विरुद्ध राहूल असे मुद्दे निवडणुकीपूर्वी काढून भाजपा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू शकतो असा इशारा योगेंद्र यादव यांनी दिला आहे.