२०१९ लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पार्टीने देशातील सर्व ५४३ जागांसाठी एक मेगा प्लान तयार केला आहे. भाजपा ५४३ जागांसाठी एका प्रभारीची (इनचार्ज) नियुक्ती करणार आहे. याशिवाय प्रत्येक राज्यात ११ सदस्यांची एक निवडणूक टीम तयार केली जाणार आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ५४३ जागांवर नियुक्त करण्यात येणारे प्रभारी हे त्या संबंधित लोकसभा मतदारसंघातील नसतील. ११ सदस्यांच्या टीमला राज्यातील प्रमुख १३ मुद्दयांवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. भाजपाच्या मेगा प्लानशी जोडल्या गेलेल्या दोन वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे. प्रत्येक लोकसभा जागेसाठी प्रभारीची नियुक्ती करण्याची भाजपाची ही पहिलीच वेळ आहे. बहुजन समाज पक्ष गेल्या कित्येक वर्षांपासून हे मॉडल फॉलो करत आहेत. नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीआधीच लोकांपर्यत पोहोचण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना २०१४ पेक्षाही मोठ्या अंतराने २०१९ लोकसभा निवडणूक जिंकायची आहे. भाजपाने सर्व राज्यातील प्रमुखांना तेथील सामाजिक मुद्द्यांची यादी तयार करण्यास सांगितलं आहे. याशिवाय राजकीय परिस्थिती, विरोधकांची रणनीती, युतीची शक्यता आणि सरकारी योजनांच्या लाभार्थींची नावे अशी यादीच तयार करण्याचा आदेश दिला आहे.

तसंच पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असणाऱ्यांची एक वेगळी यादीही तयार करण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय त्यांची पार्श्वभूमी तपासण्यासही सांगण्यात आलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह लवकरच या राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याआधी दिलेल्या आदेशाप्रमाणे टीमची नियुक्ती झाली पाहिजे असं कळवण्यात आलं आहे.

प्रभारी किंवा इंचार्ज यांच्याव्यतिरिक्त लोकसभा मतदारसंघात भाजपा तीन सदस्यांची सोशल मीडिया टीम, तीन सदस्यांची मीडिया टीम आणि तीन सदस्यांची लीगल टीम तयार करणार आहे. भाजपा नेत्याने सांगितल्यानुसार, याशिवाय भाजपा दोन सदस्यांची नियुक्ती करणार आहे जे केंद्र आणि राज्यातील योजना व्यवस्थित लागू होत आहेत की नाही याकडे लक्ष देणार आहेत.

दौऱ्यावेळी अमित शाह ११ जणांच्या निवडणूक टीमसोबत चर्चा करणार आहेत. अमित शाह आरएसएस आणि कार्यकर्त्यांच्याही भेटीगाठी करणार आहेत. अमित शाह गतवर्षी जिंकू न शकलेल्या लोकसभा मतदारसंघातही प्रभारी नियुक्त करणार असून त्यांची भेट घेणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर पक्षाच्या महासचिवांना काही विशेष राज्यांचा दौरा करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mega plan for 2019 election
First published on: 25-06-2018 at 13:34 IST