केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी हे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भारतातील मुसलमान हे प्रभु श्रीरामाचे वंशज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतातील मुसलमान हे मुघलांचे वंशज नसून रामाचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांनी राम मंदिराचा विरोध करुन नये आणि जे राम मंदिराचा विरोध करत आहेत. त्यांनीही समर्थनात यावे नाहीतर त्यांच्यावर हिंदू नाराज होतील. मुसलमानांचा ते जर तिरस्कार करुन लागले आणि तिरस्काराचे स्वरुप तीव्र झाले तर मुसलमानांनी काय होईल याचा विचार करावा. राम मंदिर व्हायलाच हवे. हे प्रकरण कर्करोगाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. राम मंदिर उभारले नाही तर यावर उपचार करणेही अशक्य होईल, असे गिरिराज सिंह म्हणाले.

लोकसंख्या समाधान फाऊंडेशन अंतर्गत आयोजित लोकसंख्या कायदा रॅलीत ते बोलत होते. ते म्हणाले, जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी आहे. तिथे त्यांचा आवाज बंद होतो. उत्तर प्रदेशमधील २० जिल्ह्यांमध्ये २० वर्षांनंतर हिंदुंचे तोंडही उघडले जाणार नाही. देशात असे ५४ जिल्हे आहेत. जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. येत्या काही वर्षांत २५० जिल्ह्यात अशी स्थिती होईल. सर्वधर्म समभाव शिकवायचे असेल तर मुसलमानांना शिकवा. सनातन वगळता सर्वधर्म समभाव शक्य नाही. देशात जिथे हिंदूंचे प्रमाण घटले. तिथे सामाजिक समरसता नष्ट झाली आहे. देशाचे जितके नुकसान मुघलांनी केले. तितकेच नुकसान नेत्यांनी केले असल्याचे त्यांनी म्हटले.

मी सनातन धर्मासाठी भाजपा, मंत्रिपद आणि खासदारकी सोडू शकतो, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी देशाचा विकास आणि सामाजिक समरसतेसाठी लोकसंख्या कायदा गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. वाढती लोकसंख्या देशासमोराील मोठी समस्या आहे. दर मिनिटाला २९ बालके जन्माला येतात.