कायम सर्वांच्या मदतीला धावून येणाऱ्या, तसेच उत्तम वक्त्या, अजातशत्रू राजकारणी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. रात्रीच्या सुमारास त्यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भावूक ट्विट केलं आहे.

स्मृती इराणी यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला एक तुमच्याशी एक तक्रार आहे. मला लंचवर नेण्यासाठी तुम्ही बासुरीला एक हॉटेल निवडायला सांगितलं होतं. परंतु तुम्ही मला दिलेलं वचन पाळलं नाहीत. तुम्ही आम्हाला सोडून निघून गेलात, अशा आशयाचं ट्विट स्मृती इराणी यांनी केलं आहे. बासुरी या सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत. स्मृती इराणी आणि सुषमा स्वराज यांचे कौटुंबिक संबंध होते.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात स्वराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी एस. जयशंकर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. सौदी अरेबिया, लिबिया, येमेन, सुदान यांसारख्या अनेक देशातील भारतीयांना स्वराज यांनी सुरक्षित मायदेशी आणलं होतं. एवढंच काय तर एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट किंवा काही महत्त्वाची कागदपत्रं हरवली तर त्या संबंधित ठिकाणच्या भारतीय उच्चायोगातील अधिकाऱ्यांना त्यांच्या मदतीसाठी पाठवत असत. पाकिस्तानसारख्या देशातूनही कोणत्या नागरिकांनी मदत मागितली तर त्या मदतीसाठी तत्पर होत्या. पाकिस्तानातून अनेकांना भारतात उपचारासाठीही त्यांनी व्हिसा मिळवून दिला होता.