भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ते महापालिकेच्या अधिकाऱ्यास चक्क बॅटन मारताना दिसत आहेत. इंदुर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक जुन्या व पडण्याची शक्यता असलेली घरं पाडण्यासाठी आले होते. त्यावेळी आकाश विजयवर्गीय हे त्यांच्यावर धावून गेले. याप्रकरणी आमदार आकाश यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुरूवातीस महापालिका अधिकारी व आकाश विजयवर्गीय यांच्यात वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या आकाश यांनी बॅट घेऊन अधिकाऱ्यांना मारण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावेळी आकाश यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांनी देखील या अधिकाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण केली.

पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासनाने या परिसराती जुनी घर व इमारती पाडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवरच हे अधिकारी कारवाई करण्यासाठी आले होते. आकाश विजयवर्गीय हे या अगोदर देखील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. ते सध्या इंदुर-३ विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. तर त्यांचे वडिल कैलाश विजयवर्गीय हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. शिवाय पश्चिम बंगालचे प्रभारी म्हणुन त्यांच्यावर जबाबदारी आहेत.

या घटनेबाबत आमदार आकाश यांना माध्यमांशी बोलतांना सांगितले  होते की, ही तर केवळ सुरूवात आहे. आम्ही या भ्रष्टाचाराचे व गुंडाराजचे समुळ उच्चाटण करू. आवेदन, निवेदन आणि नंतर मग दणादण अशीच आमची कृती असणार आहे.

तसेच आमदार आकाश म्हणाले होते की, मी जेव्हा घटनास्थळी पोहचलो होतो तेव्हा या अधिकाऱ्यांच पथक महिलेस ओढून घराबाहेर काढत होते, शिवाय नागरिकही त्यांच्यावर चिडलेले होते.  आता या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार देण्यासाठी आम्ही पोलिस ठाण्यात आलो आहोत.