भाजपा आमदार आशिष देशमुख यांचा आमदारकीचा राजीनामा विभानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अखेर मंजूर केला. भाजपात अनेक काळापासून नाराज असलेले आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी (दि.२) ई-मेलच्या माध्यमातून पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्यादिवशी विधानसभेत प्रत्यक्ष जाऊन त्यांनी अध्यक्षांकडेही आपला राजीनामा सोपवला होता. मात्र, अध्यक्ष बागडे यांनी तो मंजूर केला नव्हता.


आशिष देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. मात्र, भाजपामध्ये ते बऱ्याच काळापासून नाराज आहेत. अनेकदा त्यांनी उघडपणे भाजपाच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपामधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. त्यानंतर गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच दिवशी वर्ध्यात सेवाग्राममध्ये जाऊन त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेटही घेतली होती.

आशिष देशमुख यांना आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यापूर्वी त्यांच्या काटोल मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केले आहे. आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख हे शरद पवार यांचे राजकीय विरोधक होते. तर राष्ट्रवादी हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास तयार नाही.

दरम्यान, लोकसभेसाठी जर संधी मिळाली तर नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असेही देशमुख यांनी रजीनाम्यानंतर नुकतेच नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत म्हटले होते. तसेच राजीनाम्यानंतर भाजपातील अनेक नाराज आमदारांनी आपल्याला फोन करुन समर्थन दर्शवल्याचा दावाही त्यांनी केला होता.