राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कुरखेडाजवळ बुधवारी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात शीघ्रकृती पथकाचे (क्यूआरटी) १५ जवान शहीद झाले. जवानांना घेऊन जाणाऱ्या खासगी गाडीचा चालकही या हल्ल्यात मृत्युमुखी पडला. या हल्ल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु झाले आहे. मात्र या नक्षली हल्ल्यावरुन राजकारण करताना भाजपाच्या एका नेत्याने गडचिरोली छत्तीसगडमध्ये असून काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यात हा हल्ला झाल्याचा जावई शोध लावला आहे.

कर्नाटकमधील चिकमंगळूर येथील भाजपाचे आमदार सी. टी. रवी यांनी ट्विट करुन गडचिरोलीतील हल्ल्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरत गडचिरोली छत्तीसगडमध्ये असल्याचे म्हटले आहे. रवी यांनी केलेल्या ट्विटमध्ये, ‘गडचिरोलीमध्ये झालेल्या भ्याड नक्षली हल्ल्यात आपले शूर जवान शहिद झाले. शहीद जवानांसाठी मी प्रार्थना करतो. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यापासून देशद्रोह्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांना शोधून कठोर शिक्षा द्यायला हवी’ असे म्हटले आहे.

रवी यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांना गडचिरोली छत्तीसगडमध्ये नसून महाराष्ट्रात असल्याचे सांगितले आहे. नक्षली हल्ल्याचे राजकारण करताना कमीत कमी हल्ला झालेले ठिकाण कुठे आहे याची तरी माहिती करुन घ्या असंही नेटकऱ्यांनी रवी यांना सुनावले आहे.

लाज वाटू द्या

काही बोलूच नका

चौकीदार तुम्हाला हे ठाऊक आहे का?

आयटी सेलमधील लोक

मोदींच्या परदेश दौऱ्याचा परिणाम

काँग्रेसचे नेते संजय झा यांनीही ट्विट करुन भाजपाला गडचिरोली छत्तीसगडमध्ये नाही तर महाराष्ट्रात आहे हे ही ठाऊक नाही हा मोदींच्या परदेश दौऱ्याचा परिणाम आहे असे खोचक ट्विट केले आहे.

मात्र इतकी टिका झाल्यानंतरही रवी यांनी आपले ट्विट डिलीट केले नसून त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या स्पष्टीकरणाच्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘काँग्रेस समर्थकांना हे ठाऊक नाहीय की नक्षलवाद्यांना छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सरकार आल्यानंतर नवसंजीवनी मिळाली आहे. काँग्रेस समर्थकांनी इतिहास वाचायला हवा. २००४ मध्ये आंध्रप्रदेशमध्ये काँग्रेस सत्त्तेत आल्यानंतर नक्षलवाद कशाप्रकारे वाढला हे त्यांनी जाणून घ्यायला हवं.’

दरम्यान लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीत भरघोस मतदान झाले होते. यामुळे नक्षलवाद्यांनी २२ ते २८ एप्रिलदरम्यान बंदचे आवाहन केले होते. मात्र, त्यास स्थानिकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने नक्षलवादी बिथरले होते. त्यामुळे आपले वर्चस्व दाखवून देण्याबरोबरच गेल्या वर्षी कसनासूर-बोरीयाच्या जंगलात पोलिसांनी ४० नक्षलवाद्यांना ठार केल्याचा बदला घेण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.