राजस्थानमध्ये पोटनिवडणुकीत भाजपाच्या पराभवावर त्यांच्याच पक्षाचे एक आमदार आनंदी असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जसं केलं तसंच फेडावे लागणार असल्याचे हे आमदार आपल्या कार्यकर्त्याला सांगत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये लक्षात येते. ज्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या आमदाराने यापूर्वी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात बंडाचा झेंडा पुकारलेला आहे. भाजपाच्या महामंत्र्यांनाही राज्याच्या नेतृत्वात परिवर्तन करण्याची गरज असल्याचे पत्र त्यांनी लिहिलेले आहे. ग्यानदेव आहुजा असे या आमदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे पोटनिवडणुकीच्या निकालानंतर भाजपाच्या एका प्रदेश स्तरावरील नेत्यानेही वसुंधरा राजे यांच्याविरोधात केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली होती.

गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये लोकसभेच्या अलवर आणि अजमेर या दोन व विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. या तिनही जागांवर काँग्रेसचा मोठ्या फरकाने विजय झाला होता. तेव्हापासून भाजपातील केंद्रीय नेतृत्वही वसुंधरा राजे यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे या वर्षाअखेर राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आहुजा कार्यकर्त्यासमोर गुणगुणतच वसुंधरा राजेसंबंधी बोलताना आढळतात. जैसा किया है तूने, वैसा ही भरेगा, तेरी बदी का बदला, तूझको यहीं मिलेगा.. असे म्हणत मी तर ४० हजारांनी पराभूत झालोय तरीही मस्त आहे. मी मौला आहे, हरफनमौला आहे. पराभवाने सरकार बदनाम, जसवंत बदनाम. आम्ही थोडेच पराभूत झालोत, निवडणुकांमध्ये तर सरकारचा पराभव झाला आहे. त्यांनी कार्यकर्त्याला वेट अँड वॉच असेही म्हटले.

एकंदर राजस्थान भाजपामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला विरोधी पक्षापेक्षा पक्षांतर्गतच मोठा विरोध सहन करावी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निवडणुकीचे वर्ष असल्याने मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. आपल्या अंदाजपत्रकात त्यांनी शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याची घोषणा केली. शिक्षण विभागात ७७ हजार पदांची भरती करण्याची घोषणाही केली.