उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय दृष्ट्या देशातील सर्वात महत्वाच्या राज्यांपैकी एक असणाऱ्या राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच या निवडणुकीमध्ये ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमने पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच भाग म्हणून मागील काही काळापासून या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन जनाधार गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं असतानाच आता एका भाजपा आमदाराने ओवैसींवर कठोर शब्दात टीका केलीय.

बिहारमधील बिसफी मतदारसंघातून २०२० साली निवडून आलेले भाजपा आमदार हरी भूषण ठाकूर यांनी पाटण्यामध्ये बोलताना ओवैसींवर टीका केलीय. ठाकूर यांनी ओवैसींची तुलना थेट पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्याशी केलीय. “त्यांचा (असदुद्दीनओवैसींचा) अजेंडा हा धार्मिक आहे. त्यांना देशातील दुसरे जिन्ना व्हायचंय. त्यांचा फक्त एकच अजेंडा आहे, तो म्हणजे जगाचं तालिबानीकरण आणि इस्लामीकरण करणं,” असं म्हणत ठाकूर यांनी ओवैसींवर निशाणा साधलाय. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

ओवैसींवर काही दिवसांपूर्वीच दाखल झालाय गुन्हा…

काही दिवसांपूर्वीच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या वक्तव्यामुळे जातीय तेढ  निर्माण होऊन सलोखा बिघडल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड नियमांचे पालन न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात असभ्य व अपमानकारक वक्तव्ये केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असलेल्या असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात गुरुवारी रात्री बाराबंकी पोलिसांनी त्यांच्या पक्षाच्या सभेत असभ्य वक्तव्ये केल्याने गुन्हा दाखल केला आहे. भादंवि १५३ ए (धार्मिक तेढ), कलम १८८ (सार्वजनिक सेवकांचा अवमान), कलम २६९ (रोग प्रसाराने इतरांना धोका निर्माण करणे), कलम २७० ( रोग पसरवण्यास कारण ठरणे) तसेच साथरोग कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी म्हटले आहे.

का दाखल करण्यात आलाय गुन्हा, पोलिसांनी सांगितलं कारण…

असोदुद्दीन ओवैसी हे हैदराबादचे खासदार असून त्यांनी कोविड नियमातील मास्क व सामाजिक अंतराच्या निकषांचे उल्लंघन करून कत्रा चंदना येथे पक्षाची सभा घेऊन मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवली होती. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ओवैसी यांनी असे वक्तव्य केले होते, की रामस्नेही घाट मशीद शंभर वर्षे जुनी होती व ती प्रशासनाने पाडून टाकली, त्याचा ढिगाराही उचलण्यात आला. ओवैसी यांनी ज्या मशिदीचा उल्लेख केला ती तहसील परिसरात विशेष न्याय दंडाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर आहे. १७ मे रोजी बाराबंकीच्या विशेष दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही मशीद पाडण्यात आली होती. बाराबंकीचे जिल्हा दंडाधिकारी आदर्श सिंह यांनी सांगितले, की सदर मशीद बेकायदेशीर असून तहसील प्रशासनाने १८ मार्चला तिचा ताबा घेतला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने याबाबतची याचिका निकाली काढली होती. बाराबंकीचे पोलीस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितले की, ओवैसी यांनी जातीय सलोखा धोक्यात आणून पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या विरोधात वातावरण तयार केले. ओवैसी नुकतेच तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. त्यांचा पक्ष तेथे विधानसभेच्या १०० जागा लढवणार आहे.

काय म्हणाले होते ओवैसी?

ओवैसी यांनी असा आरोप केला होता की, देशाचे रूपांतर हिंदू राष्ट्रात करण्याचा प्रयत्न गेल्या सात वर्षात सुरू आहे. तिहेरी तलाकविरोधात सरकारने कायदा केला असून हिंदू महिलांचीही स्थिती फारशी चांगली नाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मोदी सत्तेवर आल्यापासून देशाची वाटचाल धर्मनिरपेक्षतेकडून हिंदू राष्ट्राकडे झाली आहे. तिहेरी तलाक कायद्यावर टीका करताना त्यांनी सांगितले की, यात मुस्लीम महिलांवर अन्याय झाला आहे पण त्या गप्प आहेत. हिंदू महिलांनाही पुरुष अशीच वागणूक देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची पत्नी गुजरातमध्ये एकटीच राहते. तिच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर नाही असे ते म्हणाले.