लोकप्रतिनिधींमध्ये सत्तेची नशा कशी असते याचं आणखी एक उदाहरण उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद येथे पाहायला मिळालं. शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अलाहाबादच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान पोलीस अधीक्षकांनी आदित्यनाथ यांची भेट घेण्यापासून रोखल्यामुळे येथील भाजपा आमदार हर्षवर्धन वाजपेयी यांनी चांगलाच गोंधळ घातला. पोलीस अधिक्षक गंगापार सुनील सिंह यांना अपशब्दांचा वापर त्यांनी केला. ‘तुम लोग लातों के भूत हो, लातों से ही मानते हो असं ते म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी योगी अलाहाबादच्या दौऱ्यावर होते. बाघंबरी येथील मठामध्ये आखाडा परिषदेच्या अधिकारी आणि संतांसोबत त्यांचा भोजन कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी आमदार हर्षवर्धन वाजपेयी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आतमध्ये जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा तेथे तैनात एसपी गंगाधर सुनील सिंह यांनी त्यांना आतमध्ये जाण्यास रोखलं. त्यानंतर आमदाराने एसपी सिंह यांना अपशब्द वापरत धमकी देण्यास सुरूवात केली. मी भाजपाचा दिग्गज नेता आहे आणि आमदार आहे, असं आमदार म्हणाले.

त्यावर, तुम्ही कोणीही असाल, पण मला माझी ड्यूटी माहिती आहे. आतमध्ये जाण्यासाठी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांव्यतिरिक्त कोणालाही परवानगी नाही, असं उत्तर सिंह यांनी दिलं. त्यानंतर आमदार चांगलेच संतापले आणि ‘तुम लोग लातों के भूत हो लातों से ही मानने वाले हो, तुम लोग जूतों की ही भाषा समझते हो’ असं म्हणाले. अधिकाऱ्यांसोबत अशाप्रकारे अर्वाच्च आणि अपशब्दांचा वापर करुन बोलणं हे आमदार वाजपेयी यांच्यासाठी नवं नाही. यापूर्वीही एका पोलीस अधीक्षकांना फोनवर शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पाहा व्हिडीओ –