जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वातील मांसबंदीचा विषय मुंबईसह देशभर गाजत असतानाच काश्मीरमधील भाजप नेते खुर्शीद अहमद मलिक यांनी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावत आज, रविवारी गोमांस मेजवानी आयोजिली आहे. गोमांसबंदीसाठी भाजप आग्रही असतानाच या पक्षाच्या नेत्याने ही मेजवानी आयोजिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

धार्मिक सहिष्णुता, बंधुभाव आणि धर्मनिरपेक्षता वाढविण्यासाठी ही मेजवानी आयोजित केल्याचा मलिक यांचा दावा आहे. या मेजवानीत हिंदूंसाठी शाकाहारी भोजन तर मुस्लिमांसाठी गोमांस असेल. एक मुसलमान म्हणून मी माझ्या धर्माबाबत तडजोड करू शकत नाही, असे २०१४मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले मलिक म्हणाले.
विशेष म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे निर्मलकुमार सिंग हे असताना ही गोमांस मेजवानी होत आहे. त्यामुळे या मेजवानीला भाजपची मान्यता आहे का, असे विचारता, या गोष्टीचा पक्षाशी संबंध नाही, असे ते म्हणाले. माझ्या लोकांना, विशेषत: मुसलमानांना सशक्त करण्यासाठी मी भाजपमध्ये आलो आहे. मी तसे करू शकलो नाही, तर मी त्यांच्या मदतीसाठी दुसरा मार्ग शोधून काढेन, असे ते म्हणाले.
गोमांसबंदीबाबतच्या न्यायालयाच्या आदेशावर काश्मीरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, मुस्लिम नेत्यांनी याला ‘धर्मातील हस्तक्षेप’ म्हटले आहे.