भाजपाच्या महिला आमदार साधना सिंह यांची जीभ चांगलीच घसरली आहे. त्यांनी बसपा प्रमुख मायावती यांच्यावर अतिशय वाईट शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यात साधना मायावतींवर आक्षेपार्ह टीका करताना दिसत आहेत. सिंह यांनी मायावतींची तृतीयपंथियांशी तुलना केली असून त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मायावतींबाबत वक्तव्य केले आहे. यावरुन उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे. अशाप्रकारच्य बेताल वक्तव्यावरुन आमदार सिंह यांना बसपाने नोटीस बजावली आहे. याबरोबरच महिला आयोगानेही या वक्तव्याची दखल घेऊन साधना सिंह यांना नोटीस बजावण्याचे संकेत दिले आहेत.

चंदोलीमधील मुगलसराय मतदार संघातील आमदार असलेल्या साधना सिंह परनपुरा गावातील किसान कुंभ अभियान कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्यावेळी त्यांनी मायावतींवर ही टीका केली. त्या म्हणाल्या, ”उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री स्त्री आणि पुरुष दोन्हीही नाहीत. जेव्हा द्रौपदीचे वस्रहरण झाले तेव्हा महाभारत घडले. मात्र सपाने मायावतींचे वस्रहरण केले. पण त्यानंतरही सत्तेच्या मोहापायी त्यांनी सपासोबत आघाडी करून महिलांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला आहे.”

दरम्यान, भाजपाच्या महिला आमदारांनी केलेल्या या टीकेविरोधात बसपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असा टोला हसपा नेते सतीशचंद्र मिश्रा यांनी लगावला आहे. भाजपा नेत्यांनी मायावतींविरोधात ज्या भाषेचा वापर केला आहे. तो त्यांची पातळी दाखवतो. सपा-बसपा आघाडी झाल्यानंतर भाजपा नेत्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे, असे मिश्रा म्हणाले.