उत्तर प्रदेश सरकारने काही दिवसांपूर्वीच ताजमहालला पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळल्याने मोठा वाद झाला होता. हा वाद ताजा असतानाच आता उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी ताजमहालबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ताजमहाल भारतीय संस्कृतीवर कलंक असल्याचे वक्तव्य सोम यांनी केले आहे. ताजमहालची निर्मिती ‘गद्दारां’नी केली होती, असेही त्यांनी म्हटले.

‘ताजमहालला उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळल्याने अनेकजण चिंतेत आहेत. आपण कोणत्या इतिहासाबद्दल बोलत आहोत? ज्या व्यक्तीने (शहाजहान) ताजमहालाची उभारणी केली, त्या व्यक्तीने त्याच्या वडिलांना कैद केले होते. त्याला हिंदूंची कत्तल करायची होती. जर हाच इतिहास आहे, तर हे अतिशय दु:खद आहे. आम्ही हा इतिहास बदलून टाकू. मी तुम्हाला याची खात्री देतो,’ असे भाजपचे आमदार संगीत सोम यांनी म्हटले. यापुढे बोलताना त्यांनी मुघल बादशहा बाबर, औरंगजेब आणि अकबर यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला.

भाजपचे खासदार अंशुल वर्मा यांनीही संगीत सोम यांची री ओढली. ‘ताजमहाल पर्यटनस्थळ आहे. त्याचा संबंध भारतीय संस्कृतीशी जोडला जाऊ नये. सोम यांनी कोणतेही आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त विधान केलेले नाही. त्यांच्या विधानाचे राजकारण केले जात आहे,’ असे वर्मा यांनी म्हटले. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश सरकारने १७ व्या शतकात उभारल्या गेलेल्या ताजमहालला पर्यटनस्थळांच्या यादीतून वगळले होते. त्यामुळे मोठा वाद झाला होता. मुघल बादशहाकडून या वास्तूची उभारणी करण्यात आल्यानेच उत्तर प्रदेश सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आल्याची टीकाही झाली होती.

याबद्दल बोलताना काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आणि राज्यात पर्यटनमंत्री असलेल्या रिटा बहुगुणा जोशी यांनी सावध पवित्रा घेतला. ‘ताजमहाल हा आपला सांस्कृतिक वारसा असून या वास्तूचा समावेश जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये केला जातो,’ असे त्यांनी म्हटले. ‘सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचा संपूर्ण विकास करुन तिथे मुलभूत सुविधा उपलब्ध करणे ही सरकारची प्राथमिकता आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

ताजमहालला भारतीय संस्कृतीवरील कलंक म्हणणारे भाजप आमदार संगीत सोम याआधीही त्यांच्या कृत्यांमुळे आणि विधानांमुळे वादात राहिले आहेत. २०१३ मध्ये मुझफ्फरनगरमध्ये दंगल भडकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुजफ्फरनगर दंगलीत ६० हून अधिक जणांचा जीव गेला होता. या दंगलीमुळे हजारो लोकांना पलायन करावे लागले होते. संगीत सोम त्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे अनेकदा चर्चेत राहिले आहेत.