12 December 2019

News Flash

भाजप आमदाराची मुक्ताफळं; मोदी रामाचे अवतार, तर अमित शहा लक्ष्मण…

भाजपचे नेते हे वादग्रस्त विधान करण्यासाठी कायम चर्चेत असतात. या यादीत आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे.

भाजपचे नेते हे वादग्रस्त विधान करण्यासाठी कायम चर्चेत असतात. भाजप नेते आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव हे तर गेल्या काही दिवसात सतत याच कारणासाठी जास्त चर्चेत आहेत. या यादीत आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे. ते म्हणजे भाजपचे आमदार सुरेंद्र सिंग. सिंग यांनी एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधत असताना रामायणातील काही पात्रांना थेट भाजप नेत्यांशी जोडले आहे.

आमदार सुरेंद्र सिंग यांनी त्या कार्यक्रमात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामचंद्र यांचे अवतार असल्याचे विधान केले आहे. भारतात रामराज्याची स्थापना करण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या भगवान राम यांचे मोदी हे अवतार असल्याची मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत.

सुरेंद्र सिंग इतक्यावरच थांबले नसून पुढे ते म्हणाले की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देवानेच पृथ्वीवर पाठवले आहे. ते प्रभू रामचंद्र यांचा भाऊ लक्ष्मण याचा अवतार आहेत आणि त्यासह बुद्धिमत्तेच्या बाबतीत ते सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार चाणक्य यांच्याप्रमाणे आहेत.

या पुढेही जाऊन सिंग म्हणाले, हा एक अजब योगायोग आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ब्रह्मचारी हनुमानासारखे आहेत आणि तेदेखील पृथ्वीवर आहेत. सध्या पृथ्वीवर असलेले रामायणातील राम, लक्ष्मण आणि हनुमान हे त्रिकुट भारतात रामराज्याचे स्वप्न पूर्ण करेल आणि भारतीय राजकारणात रामराज्याची स्थापना होईल, असेही त्यांनी पत्रकारांशी सांगितले.

याशिवाय, रामायणातील आणखी एक संदर्भ जोडत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या रावणाची बहीण शूर्पणखा यांच्यासारख्या आहेत, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले आहे.

दरम्यान, याच कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सिंग म्हणाले की राहुल गांधी यांनी जरी स्वतःला पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले असले आणि त्यांना ते स्वतः पंतप्रधान होऊ शकतील, असे वाटत असले तरीही देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता अद्याप त्यांच्याकडे नाही.

या आधीदेखील वाढत्या बलात्काराच्या घटनांना मुलांचे पालक जबाबदार आहेत. ते त्यांच्या मुलांना अतिरिक्त सूट देतात म्हणून असे घडते, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.

First Published on May 12, 2018 12:51 pm

Web Title: bjp mla surendra singh says pm modi is lord ram amit shah is laxman
टॅग Laxman
Just Now!
X