राजकीय नेत्यांनी आपल्या फायद्यासाठी चौकांच्या, जिल्ह्यांच्या नावात  बदल केलेले आपण बऱ्याचवेळा पाहतो. असाच एक दावा उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील बैरिया मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी केला आहे. ते म्हणाले की, ताजमहालचे नामकरण राम महल असे केले जाईल.

शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंह म्हणाले की, आग्र्याचा ताजमहाल हे शिवकालीन मंदिर होते आणि योगी प्रशासनात लवकरच त्याचे नाव राममहाल असे ठेवण्यात येईल. सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केले.” महाराजांचे वंशज उत्तर प्रदेशच्या भूमीत दाखल झाले आहेत. समर्थ रामदासस्वामींनी ज्याप्रमाणे भारताला छत्रपती शिवाजी महाराज दिले त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशला दिले आहे,” असे सिंह म्हणाले.

मुरादाबादमधील पत्रकारांवर झालेल्या कथित हल्ल्याचा भाजपा आमदाराने तीव्र निषेध केला. १३ मार्चला  समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि अन्य २० कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यांनी पत्रकारांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.

सिंह म्हणाले की, या घटनेमुळे पत्रकारांवर लाठी वापरणारे समाजवाद्यांचे खरे रूप समोर आले आहे. “पण योगीजींच्या राजवटीत हे खपवून घेतले जाणार नाही. ”  ते पुढे म्हणाले की, “देशद्रोही मानसिकता” असणार्‍या लोकांना कोणत्याही प्रकारची पसंती दिली जाणार नाही.  “केवळ भारत आणि भारतीयतेचा गौरव करणारेच नेते होतील.”

गेल्या वर्षी हाथरस येथील एका किशोरवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर त्याने असे म्हटले होते की मुलींना संस्कार शिकवल्यास बलात्कार थांबवता येऊ शकतात.