आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपा आघाडीवर निशाणा साधत हे साप आणि विंचवाचे मिलन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मायावती या पक्क्या व्यापारी असून त्यांना केक नव्हे तर चेक हवा असतो. मायावती या ग्राहकच शोधत असतात. ज्याच्याकडे पैसा आहे, तोच ग्राहक असतो. ज्याच्याकडे पैसा असेल, तिकीट खरेदी करण्याची ताकद असेल, तोच त्यांच्या दुकानात जाईल आणि तिकीट खरेदी करेल, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.

सपा म्हणजे साप आणि बसपा म्हणजे विंचू. साप आणि विंचवाची जोडी समाजाला संकटात टाकणारी आहे. समाजाला ते डसणारे आहेत, असे ते म्हणाले. मायावती या पक्क्या व्यापारी आहेत. ते राजकारणाचा व्यापार करतात. बसपा राजकारणाचे दुकान आहे. मायावती राजकारणाचे दुकान चालवणाऱ्या आहेत.

सुरेंद्र सिंह येथेच थांबले नाहीत. त्यांनी मायावतींवर गंभीर आरोप करत म्हटले की, मायावती या फुलांच्या हाराने आनंदी होत नाहीत. त्यांना पैसा हवा असतो. त्या केकने खूश होणाऱ्या महिला नाहीत. त्यांना चेक द्यावा लागतो. मायावती यांना हार आणि केक नकोय. त्यांना पैसा आणि चेक हवाय, असे त्यांनी म्हटले.

यापूर्वीही सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. हिंदूंची लोकसंख्या वाढली पाहिजे. हिंदुंना किमान ५ अपत्ये हवीत. असे केले तरच भारतात हिंदुत्व कायम राहील, असे त्यांनी म्हटले होते. यापूर्वी बलात्कारवरूनही त्यांनी खळबळजनक वक्तव्य केले होते.