जम्मू- पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यानंतर आता काही राजकीय नेतेमंडळींनी आपली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये जम्मू – काश्मीर विधानसभा सभापतींनीही आपले मत मांडले. रोहिंग्या आणि बांग्लादेशींचा वावर हा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, या हल्ल्यासाठी जम्मू परिसरात रोहिंग्या आणि बांग्लादेशींच्या वाढत्या संख्येकडे भाजपा आमदार विक्रम रंधवा यांनी लक्ष वेधले.

जम्मू आणि आजूबाजूच्या परिसरात रोहिंग्या आणि बांग्लादेशींचा वावर वाढला असल्याचं आमच्याही लक्षात आलं आहे. त्याविषयी गेल्या काही दिवसांपासून तक्रारीही येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या गोष्टी धोकादायक असल्याचं जम्मू काश्मीर विधानसभेचे सभापती कविंदर गुप्ता म्हणाले.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना रंधवा यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जम्मू आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या बांग्लादेशी आणि रोहिंग्यांचे प्रमाण वाढत असून, ते या ठिकाणी अवैधरित्या राहत आहेत. हा सर्व प्रकार वेळीच थांबवला नाही तर येत्या काळात दहशतवादी कारवायांमध्येही त्यांचा सहभाग नाकारता येणार नाही. किंबहुना या कारवायांशी ते जोडले गेले असू शकतात. त्यामुळे याविषयी योग्य तो तपास होण्याची आवश्यकता असलल्याचे रंधवा यांनी स्पष्ट केले.

रंधवा यांच्या वक्तव्यामुळे सुंजवा हल्ल्यासाठी जम्मू परिसरातच वावरणाऱ्या रोहिंग्या आणि बांग्लादेशींना जबाबदार ठरवण्यात येत असल्याचे स्पष्ट होतेय. तेव्हा आता भाजपा आमदारांच्या या मागणीवर काही निर्णय घेतला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सुंजवा हल्ल्यानंतर जम्मू शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या लष्कराने या पूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीमही सुरू आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला.