विराजपेठ येथील भाजपा आमदार के.जी.बोपय्या यांची कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या महत्वपूर्ण विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी बोपय्या विधानसभेचे अध्यक्ष असतील. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी शुक्रवारी दुपारी बोपय्या यांना विधानसभाअध्यक्षपदाची शपथ दिली. उद्या दुपारी चार वाजता विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे.

कर्नाटक विधानसभेत शनिवारी संध्याकाळी चार वाजता बहुमत सिद्ध करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सत्ताधारी भाजपाला दिले आहेत. बहुमत चाचणी सोमवारी घ्यावी, ही भाजपाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. विधानसभेत गोंधळ झाल्यास काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांना अपात्र ठरवले जाऊ शकते. त्यावेळी बहुमताचा आकडा आपोआप कमी होईल आणि भाजपाचा बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग मोकळा होईल.

के.जी.बोपय्या चार वेळा विधानसभेवर निवडून गेले असले तरी ते सभागृहतील सर्व सर्वात वरिष्ठ आमदार नाहीत. काँग्रेस आमदार आर.व्ही.देशपांडे आठवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. बोपय्या विराजपेठमधून सलग तीनवेळा निवडून विधानसभेवर गेले आहेत. महाविद्यालयीन जीवनात ते भाजपाची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय होते. बोपय्या यांची नियुक्ती करण्याचा राज्यपालांचा निर्णय धक्कादायक आहे असे कर्नाटकातील काँग्रेसचे प्रमुख दिनेश राव यांनी म्हटले आहे.